मुंबई : विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये सर्वाधिक धक्कादायक निकाल लागला तो परळी मतदारसंघात... 'ताईगिरी' संपून आता परळीत 'दादागिरी' सुरू झालीय. 'चला राजकारण सोडून देऊ...' हे पंकजा मुंडेंचं आवाहन परळीकरांनी फारच गांभीर्यानं घेतलं म्हणा... ताईंविरोधातली नाराजी भोवली म्हणा किंवा ताईपेक्षा जास्त दादा भावला म्हणा.... पण परळीत धक्कादायक निकाल लागला.
भावा बहिणीच्या या संघर्षाकडे तमाम राज्याचं लक्ष लागलं होतं... भाजपाच्या वरच्या फळीतल्या महिला नेत्या आणि 'महाराष्ट्राच्या पहिल्या भावी मुख्यमंत्री' अशी त्यांची वर्णनंही त्यांच्या गटातून गायली जात होती. परंतु, पंकजा मुंडेंना आपला विधानसभा मतदारसंघही राखता आला नाही... यामागे काय कारणं कारणीभूत ठरली हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल.
१. मुळात मंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडेंची परळीकरांशी काही प्रमाणात नाळ तुटली
२. त्याउलट धनंजय मुंडेंनी परळीकरांशी वैयक्तिक संवादातून संपर्क वाढवला
३. सहानुभूतीचं आणि भावनिक राजकारण चालणार नाही, हा सणसणीत मेसेज मतदारांनी दिला.
४. परळीत रस्ते आणि रोजगारासंदर्भात विकासकामं रखडलीयत...
५. त्याउलट धनंजय मुंडेंनी नगरपालिकेच्या माध्यमातून चांगली कामं केल्याचं स्थानिकांचं म्हणणंय
६. २००९ मध्ये गोपीनाथ मुंडेंची मुलगी म्हणून पंकजा निवडून आल्या
७. २०१४ मध्ये मुंडेंच्या निधनानंतर सहानुभूतीमुळे आणि मोदी लाटेमुळे पंकजा सहज निवडून आल्या... पण आता तशी परिस्थिती राहिली नाही
८. परळीमधला मुस्लीम समाज पक्षापेक्षा व्यक्तीला मत देतो, यंदाच्या निवडणुकीत बहुतांश मुस्लीम समाज धनंजय मुंडेंच्या पाठीशी राहिला
९. खरं तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या सभा परळीत लावून पक्षानंही पंकजा मुंडेंचं ओबीसी नेतृत्व म्हणून प्रस्थापिक करण्याचा प्रयत्न केला... पण मतदारांनी ते साफ नाकारलं
१०. परळीच्या निकालावर परिणाम झाला तो प्रचार संपल्यानंतरच्या दोन दिवसांच्या इमोशनल ड्रामामुळे.... धनंजय मुंडेंची क्लिप व्हायरल झाली... त्यानंतर पंकजा मुंडेंना आलेली भोवळ, रडारडी ही काही मतदारांना भावली नाही....
परळी या एकमेव मतदारसंघात खुद्द पंतप्रधान मोदी आणि अमित शाह अशा दोघांनीही सभा घेतल्या.... तरीही पंकजा मुंडे पराभूत होणं, हा पक्षासाठी मोठा धक्का आहे.... त्याचं ऑडिट पक्षाला करावंच लागेल.