चित्रपटाचा वाद घरादारापर्यंत पोहोचताच अल्लू अर्जुनचा मुलांपासून दुरावा; पत्नी दोन्ही लेकरांना घेऊन...

Allu Arjun : 'पुष्पा 2'च्या प्रदर्शनानंतर जसजशा या चित्रपटाच्या कमाईच्या बातम्या आल्या तसतसं काही वादांनीही डोकं वर काढलं.   

सायली पाटील | Updated: Dec 23, 2024, 02:56 PM IST
चित्रपटाचा वाद घरादारापर्यंत पोहोचताच अल्लू अर्जुनचा मुलांपासून दुरावा; पत्नी दोन्ही लेकरांना घेऊन... title=
Pushpa 2 chaos made allu arjun to send his kids on a safe place away from him

Allu Arjun Pushpa 2 : दाक्षिणात्य कलाविश्वासमवेत सध्या संपूर्ण जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता अल्लू अर्जुन याला सध्या मात्र काहीशा आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. 'पुष्पा 2' या चित्रपटाच्या शोदरम्यान झालेली चेंगराचेंगरी, त्यानंतर पोलिसांची कारवाई आणि या संपूर्ण वादात कहर म्हणजे रविवारी अभिनेत्याच्या घरावर झालेली दगडफेक आणि घराबाहेरची निदर्शनं ही संपूर्ण परिस्थिती पाहता अभिनेत्यानं एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. 

हैदराबादमधील ज्युबली हिल्स येथील घरावर दगडफेकीची घटना घडल्यानंतर अल्लू अर्जुनचा मुलगा अयान आणि मुलगी अरहा यांना त्या ठिकाणहून सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. कथित स्वरुपात उस्मानिया विद्यापीठातील काही विद्यार्थी नेत्यांनी हा हल्ला केला, ज्यावेळी अल्लू अर्जुन घरी हजर नव्हता. 

हल्ल्यानंतर लगेचच अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी आणि तिच्या मुलांसह घराबाहेर पडताना दिसली. दरम्यान, या हल्ल्यानंतर अल्लू अरविंद यांनी माध्यमांशी संवाद साधत म्हटलं, 'आमच्या घरावर झालेला हल्ला सर्वांनीच पाहिला. आता मात्र त्यावर काम केलं जाणं अपेक्षित आहे. मला नाही वाटत की ही प्रतिक्रिया देण्याची योग्य वेळ आहे. पोलिसांनी तोडफोड करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. घराजवळ कडक पोलीस पहारा तैनात आहे. अशा घटनांना कोणीही दुजोरा देता कामा नये. ही संयमानं निर्णय घेण्याची वेळ आहे. कायदा त्याचं काम करेल'

हेसुद्धा वाचा : 500 रुपयांची नोट... केंद्र सरकार मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत? 

उपलब्ध माहितीनुसार हल्लेखोरांनी संध्या थिएटरमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या रेवती नामक 35 वर्षीय महिलेच्या कुटुंबीयांसाठी अभिनेत्याकडून मदत स्वरुपात 1 कोटी रुपयांची मागणी केली. दरम्यान, अल्लू अर्जुनविरोधात कैक निदर्शनं होत असतानाच चाहत्यांनीसुद्धा या अभिनेत्याला पाठिंबा देत सोशल मीडिया कॅम्पेन सुरू केल्याचं पाहायला मिळालं.