"धमक्या देऊ नका, तुम्हाला मुंबई, ठाण्यात यायचं आहे हे लक्षात ठेवा," संजय राऊतांचा अजित पवारांना जाहीर इशारा

LokSabha: तुम्ही बारामतीत धमक्या देत आहात. पण तुम्हाला मुंबईत यायचं आहे हे लक्षात ठेवा. रस्ता आमचाच आहे अशा शब्दांत संजय राऊत यांनी नाव न घेता अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ही मर्दांची सभा आहे. जे नामर्द, डरपोक होते ते सगळे सोडून गेले असंही ते म्हणाले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Mar 23, 2024, 02:52 PM IST
"धमक्या देऊ नका, तुम्हाला मुंबई, ठाण्यात यायचं आहे हे लक्षात ठेवा," संजय राऊतांचा अजित पवारांना जाहीर इशारा title=

LokSabha: तुम्ही बारामतीत धमक्या देत आहात. पण तुम्हाला मुंबईत यायचं आहे हे लक्षात ठेवा. रस्ता आमचाच आहे अशा शब्दांत संजय राऊत यांनी नाव न घेता अजित पवारांवर निशाणा साधला आहे. हिंमत असेल तर धमक्या न देता आपापला प्रचार करा आणि बारामतीत निवडून येऊन दाखवा. ही बारामतीची नव्हे तर महाराष्ट्राची लढाई आहे. ही महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमानाची लढाई आहे. ही फक्त शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची लढाई नाही असं संजय राऊत म्हणाले आहेत. इंदापूरमधील महाविकास आघाडीच्या सभेत ते बोलत होते.

"पायाखालची वाळू सरकली की दहशतवादाचा मार्ग स्विकारला जातो. माणूस घाबरला, पराभवाची भीती वाटू लागली, लोक स्विकारणार नाहीत याचं भय वाटू लागलं की मोदींचा मार्ग सुरु होतो. धमकवायचं, पोलिसांचा वापर या गोष्टी सुरु होतात," अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. 

पुढे ते म्हणाले की, "आम्हाला धमक्या नवीन नाहीत. आम्ही धमक्या देतोही आणि घेतोही. धमक्या समोरुन नाही तर फोनवरुन आवाज बदलून दिल्या जातात. पण महाराष्ट्राला आता त्यांची चिंता नाही. तुमचं अस्तित्व फार थोडं आहे. तुम्ही बारामतीत धमक्या देत आहात. पण तुम्हाला मुंबई, ठाण्यात यायचं आहे हे लक्षात ठेवा. रस्ता आमचाच आहे.  तुम्ही शरद पवारांच्या माणसांना धमक्या देत आहात की शिवसैनिकांना देत आहात. लक्षात ठेवा ही मर्दांची सभा आहे. जे नामर्द, डरपोक होते ते सगळे सोडून गेले. हिंमत असेल तर आपला प्रचार करा आणि बारामतीत निवडून येऊन दाखवा. ही बारामतीची नव्हे तर महाराष्ट्राची लढाई आहे. ही महारष्ट्राची अस्मिता, स्वाभिमानाची लढाई आहे. ही फक्त शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची लढाई नाही". 

"बारामतीचं कोणी गुजरात करु पाहत असेल तर येथे शिवसेनेचा भगवा झेंडा ठामपणे उभा राहील असा निर्धार संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. गुजरातमधील जनता, व्यापारी यांच्याशी आमचं वैर नाही. पण वृत्तीला पायबंद घातला पाहिजे. धमक्या देऊन मत मागणाऱ्यांनी गेल्या काही वर्षात काहीच विकास केलेला नाही. लोक सोबत नसल्याने ते धमक्या देत आहेत," असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. 

"देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा आलो आणि दोन पक्ष फोडून आलो असं म्हटलं आहे. ही काय पात्रता आहे का? राजकारणातील माणूस आपल्या कामांबद्दल सांगतो. पण हे महाशय पक्ष फोडून आल्याचं सांगतात," अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. 

चार महिन्यांनी देशातील सरकार बदलणार आहे. महाराष्ट्रात तुम्ही आणि केंद्रात मोदी नसेल. सत्ता आमच्याकडे असेल. तुम्ही ईडी, सीबीआयच्या भीतीने पक्ष फोडले आहेत. उद्या आमच्या हातात यंत्रणा आल्यावर तुमचा पक्ष शिल्लक राहतो का पाहा असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.