तुळजाभवानीचे दर्शन, खडसेंचा 'तो' फोन अन् युती तोडल्याचा निरोप, उद्धव ठाकरेंनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

  यावेळी उद्धव ठाकरेंनी युती तोडण्याची संपूर्ण कहाणी सांगितली. यावेळी त्यांनी मग तेव्हा युती तुम्ही का तोडलीत? असा प्रश्नही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला. 

Updated: May 13, 2024, 09:02 AM IST
तुळजाभवानीचे दर्शन, खडसेंचा 'तो' फोन अन् युती तोडल्याचा निरोप, उद्धव ठाकरेंनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम title=

Uddhav Thackeray Interview : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. आता या मुलाखतीच्या उत्तरार्धात उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाह यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी युती तोडण्याची संपूर्ण कहाणी सांगितली. यावेळी त्यांनी मग तेव्हा युती तुम्ही का तोडलीत? असा प्रश्नही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला. 

‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतमधील इंग्रजांच्या वखारी लुटल्या. त्याचा राग मोदी-शहा शिवसेनेवर आणि महाराष्ट्रावर काढीत आहेत काय?’’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांना शिवसेना पक्ष फोडणं, सरकार पाडणं हा जो संपूर्ण प्रकार केला आहे, हा उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी केला आहे., असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, मी तुम्हाला एक जुनी आठवण सांगतो. 2014 साली मोदींच्या पंतप्रधानपदाला भाजपव्यतिरिक्त पाठिंबा देण्याचं पहिलं पाप कोणी केलं असेल, तर शिवसेनेने केलं आहे.

'तेव्हा तर आम्ही काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो'

तुम्ही याला पाप म्हणताय, असे विचारण्यात आले असता ते म्हणाले आता तसं म्हणतोय, कारण ते आम्हाला संपवायला निघाले आहेत. आधी ते स्वप्नवत होतं की मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेताहेत. मी समोर बसलोय, माझ्या शेजारी अमित शहा बसले होते. हे सत्य आहे की स्वप्न आहे, हेच आम्हाला कळत नव्हतं. साधारणतः जून महिन्यात हा शपथविधी झाला. ऑक्टोबरच्या विधानसभा निवडणुकीत चार-पाच महिन्यांत असं कोणतं पाप आम्ही केलं होतं? की भारतीय जनता पक्षाने शिवसेनेशी युती तोडली. तेव्हा तर आम्ही काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. 

तेव्हा यांच्या मानेवर बसलेला जो औरंगजेब आहे, त्या औरंगजेब फॅन क्लबमध्ये मी नव्हतो. मग तुम्ही माझी युती 2014 साली का तोडलीत? एकनाथ खडसेंनीही त्यावर भाष्य केले होते, की त्यांना वरून सांगण्यात आलं की, युती तोडण्याचा निरोप तुम्ही कळवा. मी तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आलो त्याच दिवशी संध्याकाळी एकनाथ खडसेंचा फोन आला की, ‘उद्धवजी… आता आपली युती काही राहात नाही. आम्ही हा निर्णय घेतलाय, आपल्याला कळवायला सांगितले आहे की, आम्ही युती तोडतोय.’ मग तेव्हा युती तुम्ही का तोडलीत?, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. 

'तो कोळसा मला आता उगाळायचा नाही'

तेव्हा तर तुम्ही हिंदुत्ववादी होतात आणि त्यांच्या सोबतही होतो. मोदीजींचा प्रचार केला होता आम्ही… मग का युती तोडलीत? त्यानंतर अमित शहा पुन्हा ‘मातोश्री’वर आले. 2019 साली… 2014 ला युती तोडली, शेवटच्या क्षणाला तोडली. तो मधला काळ होता, जेव्हा शिवसेना विरोधी पक्ष म्हणून काम करत होती. जाऊ द्या, तो कोळसा मला आता उगाळायचा नाही, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.