Sanjay Raut Slams Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी एका कार्यक्रमामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाला मराठी मतं मिळालेली नाहीत, असं विधान केलं. तसेच हिंदू मतदार ठाकरेंपासून दूर गेल्याचंही फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी केलेल्या या दाव्यावरुन आता उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. मराठी मतं आम्हाला नाही मिळाली तर मुंबई परदेशी नागरिकांनी मतदान केलं का? असा सवाल राऊत यांनी फडणवीसांना विचारला आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मराठी लोकांची मतं मिळाली नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे, असा संदर्भ देत मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी, 'मग कोणाची मतं मिळाली आहेत?' असा प्रतिप्रश्न केला. "ही मतं तुम्हाला मिळाली का?" असा सवालही राऊत यांनी फडणवीस यांना केला आहे. "आम्हाला लाखो मतं मिळाली आहेत की कोणाची मतं आहेत? इथे दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इराण आणि इराकमधील लोकांनी येऊन मतदान केलं का?" असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
नक्की वाचा >> 'शिवसेना-भाजपा युती तुटू नये अशी RSS ची भूमिका होती, पण मोदी-शाहांचा..'; खळबळजनक दावा
"धारावीत बघा, गिरगावात बघा, भांडूपमध्ये मतदान बघा. जिथे जिथे आमचे लोक जिंकले आहेत किंवा थोडक्या फरकाने पडले आहेत तिथे मराठीच लोक राहतात. ज्यांना मतदानाचा अधिकार आहे त्यांनी आम्हाला मतदान केलं आहे. तुमचा विजय हा सरळ मिळालेला विजय नाही. तुम्ही अमोल किर्तीकरची जागा चोरली. आमचा विजय निर्मळ आणि निर्णायक आहे. या राज्यातील सर्व जाती-धर्माच्या लोकांनी आम्हाला मतदान केलं आहे. मराठी, मुस्लीम, ख्रिश्चन, पारसी असो किंवा गुजराती असो सर्वांनी आम्हाला मतदान केलं आहे," असं संजय राऊत म्हणाले.
नक्की वाचा >> 'अहंकारामुळे रामाने 241 वरच रोखलं', जाहीर कार्यक्रमात RSS चा BJP ला घरचा आहेर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता राऊत यांनी मागील 10 वर्षांपासून देशात अहंकारच पाहायला मिळाल्याचा टोला राऊत यांनी लगावला. तसेच देश टिकून रहावा असं वाटत असेल तर संघाने पडद्यामागे राहणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधताना फडणवीस हे मराष्ट्रतील राजकारणातील खलनायक आहेत, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच वायनाडमधून राहुल गांधींनी मतदासंघ सोडल्यास तिथून प्रियंका गांधी लढणार असतील तर आमचा त्यांना पाठींबा असेल असंही राऊत म्हणाले.