आशिष अम्बाडे, झी २४ तास, चंद्रपूर : भाजपाचा बालेकिल्ला झालेल्या चंद्रपुरात पाय रोवण्यासाठी काँग्रेसला उमेदवार मिळत नाही. यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून विविध पर्यायाबाबत विचार सुरु आहे. त्यामुळे उमेद्वार तणावात आहेत तर कार्यकर्ते अस्वस्थ झालेत. नरेश पुगलिया, बाळू धानोरकर, विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे, मनोहर पाउणकर, आशीष देशमुख, विलास मु्त्तेमवार... अशी लोकसभेसाठी काँग्रेसची इच्छुक उमेदवारांची यादी बरीच मोठी आहे.
गेले वर्षभर चंद्रपूर लोकसभेसाठी उमेदवारांच्या चाचपणीत शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांचे नाव काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी पुढे रेटले होते. निवडणूक पुढ्यात असताना अपेक्षेप्रमाणे शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी स्वतःच्या पक्षनेतृत्वावर जाहीर नाराजी दर्शवून आपला मार्ग ठरला असल्याचे 'मातोश्री'कडे स्पष्ट केले होते. सहा महिन्यापूर्वी काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी बैठका झाल्या. त्यानंतर काँग्रेसकडून उमेदवारीबाबत बाळू धानोरकर आश्वस्त झाले.
मात्र, बाळू धानोरकर यांचे नाव स्पष्टपणे पुढे येताच काँग्रेस पक्षातील अंतर्गत गट त्वेषाने पुढे आले. काँग्रेस आघाडीच्या काळात आ. धानोरकर यांच्याविरोधात विविध राजकीय आणि तडीपारीच्या कथित गुन्ह्यांची फाईल मुंबईतून काँग्रेस मुख्यालयात पोचली आणि बाळू धानोरकर यांचे तिकीट लटकले. तिकीटाची प्रतीक्षा लांबल्याने काँग्रेसमधील गटबाजी अधिक तीव्र होणार आहे.
काँग्रेसचे जिल्ह्यातील दिग्गज नेते विविध कारणांनी तिकीट नाकारत असल्याचे चित्र रंगविले जात आहे. उमेदवार निवडीत विलंब होत असल्यानं उमेदवारांमध्ये तणाव वाढू लागलाय तर कार्यकर्तेही अस्वस्थ झालेत.