अंधश्रद्धेपोटी पुजाऱ्याच्या सांगण्यावरून घरात आणली मानवी कवटी

व्यवसायातही भरभराट येत नसल्याने उल्हासनगरमधील एका पुजाऱ्याच्या सांगण्यावरून शर्माने घरात कवटी ठेवली होती

Updated: Mar 19, 2019, 12:56 PM IST
अंधश्रद्धेपोटी पुजाऱ्याच्या सांगण्यावरून घरात आणली मानवी कवटी title=

कपिल राऊत, झी २४ तास, कळवा : घरात सुखशांती आणि पैसा यावा यासाठी घरात मानवी कवटी ठेवणाऱ्याला ठाण्यातल्या कळवा पोलिसांनी अटक केलीय. ठाणे पोलिसांच्या अटकेत असलेल्या तीन आरोपींवर जादूटोण्याचा आरोप आहे. कळव्यातील मफतलाल झोपडपट्टी येथील फक्रुद्दीन चाळीतील एका खोलीत मानवी कवटी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर कळवा पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. यावेळी पोलिसांना त्या खोलीत मानवी कवटी सापडली. 

राजू रामअवतार शर्मा यानेच ही कवटी घरात आणून ठेवली होती. कॅटरसच्या कामानंतर सलून व्यवसायातही भरभराट येत नसल्याने उल्हासनगरमधील एका पुजाऱ्याच्या सांगण्यावरून शर्माने घरात कवटी ठेवली होती. त्यासाठी त्याने त्या पुजाऱ्याला सहा हजार रुपये मोजले, अशी कबुली शर्मा याने पोलिसांना दिली. 

शर्मापाठोपाठ पोलिसांनी पुजारी कैलास हटकरलाही अटक केलीय. त्याच्याकडून पोलिसांनी आणखी एक कवटी जप्त केली. कैलासने ज्या पांडुरंग गवारीकडून ही कवटी घेतली होती, त्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी या तिघांविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावलीय. मात्र सुखशांती येण्यासाठी अशा प्रकारे घरात कवटी ठेवणं हे पुरोगामी महाराष्ट्राला नक्कीच शोभणारं नाही.