गडचिरोलीत ४ मतदान केंद्रांवर आज फेरमतदान

 ११ एप्रिल रोजी एटापल्ली तालुक्यातल्या ४ केंद्रांवर मतदान पथके पोहोचू शकलेली नव्हती. 

Updated: Apr 15, 2019, 08:00 AM IST
गडचिरोलीत ४ मतदान केंद्रांवर आज फेरमतदान  title=
गडचिरोली :  गडचिरोलीत सोमवारी ४ मतदान केंद्रांवर फेरमतदान होत आहे.  ११ एप्रिल रोजी एटापल्ली तालुक्यातल्या ४ केंद्रांवर मतदान पथके पोहोचू शकलेली नव्हती.  त्यामुळे इथले मतदान सुरूच होऊ शकले नाही. मतदान पथके या केंद्रांवर पोहोचण्याच्या आधीच या भागात नक्षलवाद्यांनी स्फोट घडविल्याने पथकांना थांबविण्यात आले होते. आज होणाऱ्या फेरमतदानाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत सुरक्षेची कडेकोट काळजी घेण्यात आली आहे. 4 मतदार संघांमध्ये सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत सोमवारी हे मतदान होणार आहे. दरम्यान ४८ तासानंतर गडचिरोली जिल्हा प्रशासनाने मतदानाची सुधारित आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यात ७२. ०२ %  एवढे मतदान झाले आहे. 
 
लोकसभा निवडणुकीसाठी गडचिरोली-चिमुर मतदारसंघात पहिल्या टप्प्यामध्ये ११ एप्रिलला मतदान झाले. पण इथल्या चार मतदान केंद्रांवर मतदान पथकं पोहोचू शकले नाहीत. गडचिरोलीची राजकीय परिस्थिती पाहता २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. 
 
या निवडणुकीत गडचिरोली-चिमुर मतदारसंघात भाजपकडून अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक नेते यांच्यासमोर काँग्रेसच्या नामदेव उसंडी यांचं आव्हान असेल. तर वंचित बहुजन आघाडीने रमेश गजबे यांना उमेदवारी दिली आहे.
 

२०१४ निवडणुकीचे निकाल

२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये भाजपचे अशोक नेते यांनी काँग्रेसच्या नामदेव उसंडींचा २,३६,८७० मतांनी पराभव केला होता. 

२०१४ निवडणुकीची आकडेवारी

 
उमेदवार                                    पक्ष                         मिळालेली मतं
अशोक नेते                              भाजप                       ५,३५,९८२
नामदेव उसंडी                           काँग्रेस २,९९,११२
रामराव ननावरे                         बसपा                       ६६,९०६
रमेशकुमार गजबे आप                        ४५,४५८
नोटा                                                                      २४,४८८