वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर : लातूरमधून (Latur Crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लातुरमध्ये चोरट्यांना कायद्याचा धाक राहिला आहे की नाही असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. कारण लातुरात चोरट्यांनी चक्क उपजिल्हाधिकारी, तहसीलदार अअन् पोलीस उपनिरीक्षकासह सहा अधिकाऱ्यांची घरे फोडली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे बदनामीच्या भीतीने या बड्या अधिकाऱ्यांनी पोलिसांत (Latur Police) चोरीची तक्रार देखील केली नसल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. एका तलाठ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी याप्रकरणाचा शोध सुरु केला आहे.
लातूर जिल्ह्यातील चाकूर तहसील कार्यालयाच्याजवळ असलेल्या शासकीय निवासस्थानांमधील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह सहा कर्मचाऱ्यांच्या घरी चोरी झाली आहे. चोरट्यांनी या बड्या अधिकाऱ्यांच्या घरी चोरी करून लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे. तहसील कार्यालयाच्या जवळ शासकीय निवासस्थानात विविध विभागाचे 40 अधिकारी आणि कर्मचारी राहतात. शनिवारी व रविवार अशी दोन दिवसांची सुट्टी आल्यामुळे अनेकजण कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी शासकीय निवासस्थानात प्रवेश केला होता. ज्या घरात माणसे होती त्यांची घरे चोरट्यांनी बाहेरून बंद केली होती. तर ज्या घरांना कुलूप लावलेले होते त्या घरात चोरट्यांनी हात साफ केला आहे.
याठिकाणी प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षक, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या घरी चोरट्यांनी चोरी केली आहे. सकाळी कर्मचाऱ्यांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर पोलिसांना बोलविण्यात आले. या निवासस्थानी तीन पोलीस उपनिरीक्षक व दोन पोलीस कर्मचारी राहतात. तरीही चोरट्यांनी याठिकाणी चोरी केली असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन श्वानपथक व ठसे तज्ञाला पाचारण करण्यात आले होते. काही घरातून चोरट्यांनी सोने, चांदीने व रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. दरम्यान या प्रकरणी आता चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण उपजिल्हाधिकाऱ्यांसह इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या घरी चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. चोरांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.