'उद्धवजी या नारेबाजीवर सहमत आहात का?' फडणवीसांचा सवाल

उद्धव ठाकरेंकडून जामियाची तुलना जालियनवालाशी

Updated: Dec 17, 2019, 06:01 PM IST
'उद्धवजी या नारेबाजीवर सहमत आहात का?' फडणवीसांचा सवाल title=

मुंबई : जामिया इस्लामिया विद्यापीठात झालेल्या हिंसक आंदोलनाची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. टीका करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी काही व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमधल्या नारेबाजीवर तुम्ही सहमत आहात का? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

'जामिया विद्यापीठातील घटनेची तुलना मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बागशी करणे हा देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तमाम शहीदांचा अपमान आहे. जे नारे त्याठिकाणी दिले गेले, त्याच्याशी उद्धवजी सहमत आहेत का, याचे उत्तर त्यांनी कृपया देश आणि महाराष्ट्राला द्यावे', असं फडणवीस म्हणाले.

अशा आंदोलनांना प्रोत्साहन देणे यावरून तडजोडीची किती मोठी परिसीमा तुम्ही गाठली आहे, हे आता स्पष्ट झाले आहे, असं दुसरं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरामध्ये आंदोलनं सुरु आहेत. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. दिल्लीच्या जामिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला.

देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते नागपुरात बोलत होते. 'जालियनवाला बाग असल्यासारखा विद्यार्थ्यांवर गोळीबार केला जातोय, देशातील युवा वर्ग अस्वस्थ आहे... हा 'युवा बॉम्ब' आहे. त्याची वात काढण्याचं काम केंद्र सरकारनं करू नये', असा इशारा ठाकरेंनी यावेळी दिला.

देशात अशांतीपूर्ण वातावरण तयार करण्यात आलंय. मी अत्यंत जबाबदारीनं हे वक्तव्य करतोय. जामियाच्या विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला. त्यांना मारहाण करण्यात आली. जालियनवाला बागेचे दिवस परत आले की काय? अशी परिस्थिती दिसतेय. ज्या देशाची युवा पीढी अशांत असेल तो देश स्थिर कसा राहू शकतो? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला.