जालन्यात जमावाकडुन तरुणाची निर्घुण हत्या

 सोन्या उर्फ रोहित जाधव असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

Updated: Jun 10, 2019, 08:46 PM IST
जालन्यात जमावाकडुन तरुणाची निर्घुण हत्या  title=

जालना : जालन्यात जमावाकडून एकाची जमावाकडून निर्घुण हत्या झाल्याची घटना घडली आहे. सोन्या उर्फ रोहित जाधव असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शहरातील लोहार मोहल्ल्यात सहा जूनला कुख्यात गुंड तान्या उर्फ विकी जाधवचे कुटुंब आणि मोहल्ल्यातीलच काही रहिवाशांसोबत वाद झाला होता. त्यानंतर इथल्या रहिवाशांनी विकी जाधव याच्या घराची मोडतोड केली होती. याप्रकरणी रहिवाशांविरोधात पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यामुळे विकी जाधव समजून ही गंभीर मारहाण आणि मृत्यू झाला ? की गुंडाचा भाऊ म्हणून हा प्रकार घडवला याचा उलघडा झाला नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

रोहित जाधव हा तान्या जाधव याच्या कुटुंबातील सदस्य आहे. काल संध्याकाळी रोहित हा आपल्या घराची पाहणी करण्यासाठी आला असता जमावानं त्याला नाल्यात गाठून बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर झालेल्या रोहितला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. 

रोहित विरोधात विविध पोलीस ठाण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडे, चोऱ्या, घरफोड्या असे गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी धरपकड सत्र सुरु केले असून लोहार मोहल्ल्यात सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.