चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन लांबलं

पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी निराशा करणारी बातमी आहे.

Updated: Jun 10, 2019, 08:43 PM IST
चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन लांबलं title=

मुंबई : पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी निराशा करणारी बातमी आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन लांबलं आहे. अरबी समुद्रात ११ आणि १२ जूनला येणाऱ्या चक्रीवादळामुळे मान्सूनचं आगमन लांबलं आहे. अगोदरच मान्सून वाऱ्यांचा जोर हवा तसा नाही आहे. त्यात चक्रीवादळामुळे मान्सून राज्यात सक्रिय होण्यास उशीर होणार आहे. 

येत्या ३६ तासांमध्ये अरबी समुद्रात चक्रीवादळ सक्रिय होणार आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. पण तो पुढं सरकण्यासाठी अरबी सागरातील चक्रिवादळामुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. १३ जूनपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मान्सून येईल, असा अंदाज आहे.

दुसरीकडे रायगड किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने हा इशारा दिला आहे. समुद्र किनाऱ्यावर वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्याची शक्यता आहे.

कोकणच्या संपूर्ण किनारपट्टीवरच वादळी वारे वाहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हे वारे ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणार असल्याने समुद्रावर येणाऱ्या लाटा देखील अधिक उंचीच्या असणार आहेत. चार ते साडेचार मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.