Jalna Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: जालन्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. सहा टर्म खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांना यंदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसचे कल्याणराव काळे यांचा मोठ्या मताधिक्यांनी विजय झाला आहे. मात्र, अद्याप विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. मात्र, आत्तापर्यंत हाती आलेल्या कलानुसार कल्याणराव काळे यांनी विजय मिळवला आहे.
जालन्यात सुरुवातीला हाती आलेल्या कलांमध्ये रावसाहेब दानवे आघाडी होते. तर, कल्याणराव काळे पिछाडीवर होते. मात्र, आता हाती आलेल्या कलांनुसार रावसाहेब दानवे हे पिछाडीवर आहेत. रावसाहेब दानवे सत्ता राखण्यास यशस्वी होणार की कल्याणराव काळे दानवेंना मात देणार याबाबत धाकधुक असतानाच कल्याणराव काळे यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. तर, दानवेंचे सहाव्यांदा विजय मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांला पराभवाला सामोरे जावे लागल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का आहे.
जालना मतदारसंघावर भाजपची मजबूत पकड आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे आत्तापर्यंत भाजपकडून पाचवेळा विजयी झाले होते. त्यांना सहाव्यांदा भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. गेली 25 वर्षे रावसाहेब दानवे हेच खासदार राहिले आहेत. त्यामुळं 2024 मध्येही रावसाहेब दानवे गड कायम राखणार का? या कडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. 2019 मध्ये रावसाहेब दानवे यांना 6,94,945 मते मिळाली होती. तर, त्यांच्या विरोधात असलेल्या विलास औताडे यांना 3,64,348 मते मिळाली होती.
जालन्यात मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या मराठा आरक्षणाचा मु्द्दा चांगलाच गाजला होता. मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळं जालन्यातील राजकारणाला फटका बसला होता. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या मतदारांनी त्यांचे मत काँग्रेसला दिले आहे. याचाच फटका भाजपला बसला आहे.