अवघ्या 2 वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; जळगावातील धक्कादायक प्रकार

Jalgaon New : जळगावातील या धक्कादायक प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे. धरणगाव तालुक्यातील एका गावात अचानक खेळता खेळता दोन वर्षाच्या मुलाला हृदयविकाराचा झटका आल्याने कुटुंबियांच्या पायाखालची जमिन सरकली आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 1, 2023, 05:43 PM IST
अवघ्या 2 वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; जळगावातील धक्कादायक प्रकार title=
(फोटो - freepik.com)

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : हृदयविकाराचा झटका (Heart Attack) हा एक सध्याचा गंभीर आजार आहे आणि ज्याचा धोका आता प्रौढांबरोबरच लहान मुलांमध्येही दिसून येत आहे. हृदयाला रक्तपुरवठा खंडित झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो, ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंना नुकसान होते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. असाच काहीसा प्रकार जळगावात (Jalgaon News) घडलाय. धरणगाव तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे अंगणात खेळून घरात गेलेल्या दोन वर्षाच्या बालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान मुलगा घरात येऊन अचानक ग्लानी आल्याने जमिनीवर कोसळला आणि त्या बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातून ही दुःखद घटना समोर आली आहे. कार्तिक शशिकांत बडगुजर नावाच्या बालकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. धरणगाव तालुक्यातील पिंपरी खुर्द या गावातील हा बालक आहे. कार्तिक अंगणात खेळून घरात गेल्यानंतर त्याला अचानक चक्कर आली आणि तो खाली पडला. कार्तिकच्या कुटुंबियांनी त्याला तात्काळ डॉक्टरांकडे नेले. मात्र दवाखान्यात नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कार्तिकचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारण डॉक्टरांनी सांगितले. एवढ्या लहान मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कळताच कुटुंबियांना धक्काच बसला. कार्तिकच्या मृत्यूनंतर बडगुजर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

"दोन वर्षाला मुलाला घेऊन त्याचे आई वडिल माझ्याकडे आले होते. त्याला तपासले असता त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्याला कोणतीही जखम झाल्याचे कोणतीही खूण नव्हती. कार्डिअक अरेस्टमुळे त्याचा मृत्यू झालेला असावा. यामध्ये अचानक हृदय बंद होते. अचानक हृदयाची प्रक्रिया बंद झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा," असे डॉक्टर पी जी पाटील यांनी सांगितले.

मुलांमध्ये हृदयविकाराच्या तक्रारी का वाढत आहे?

काही तरुण आणि किशोरवयीन मुले चुकीचा आहार, फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खातात ज्यामुळे त्यांच्या शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असते. त्यामुळे हृदयातील रक्ताभिसरणही कमी होऊ शकते आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. तसेच तरुणांमध्ये तंबाखू आणि इतर मादक पदार्थांच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. धूम्रपान, तंबाखू किंवा इतर मादक पदार्थांच्या सेवनाने हृदयाच्या रक्ताभिसरणावर वाईट परिणाम होतो आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. यासोबतच आजकालच्या मुलांना मोबाईलचे व्यसन लागले आहे. फोन न आल्याने त्याला राग येऊ लागतो, ताण येऊ लागतो. त्यांच्यामध्ये हृदयविकाराच्या वाढत्या घटनांचे हे एक मोठे कारण आहे.