जळगाव घरकुल घोटाळ्यात सुरेश जैन यांच्यासह ४८ जण दोषी

सुनावणीवेळी न्यायालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

Updated: Aug 31, 2019, 02:57 PM IST
जळगाव घरकुल घोटाळ्यात सुरेश जैन यांच्यासह ४८ जण दोषी title=

जळगाव: राज्यातील बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्यात माजी मंत्री सुरेश जैन, प्रदीप रायसोनी यांच्यासह ४८ जणांना धुळे न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या सर्व आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले असून थोड्याचवेळात त्यांच्या शिक्षेची सुनावणी होईल. 
 अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकरणात सुरुवातीला ५७ संशयितांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यातील ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आज ४९ आरोपींबाबत सुनावणी झाली. 
 हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने सर्व संशयित तसेच त्यांच्या वकिलांना न्यायालयात बोलावण्यात आले होते. सुनावणीवेळी न्यायालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. 
 
 काय आहे जळगाव घरकुल घोटाळा?

'घरकुल योजना' ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले होते. त्यासाठी हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी सुमारे ११० कोटींचे कर्ज काढून ११ हजार घरकुले बांधण्याच्या कामास १९९९ मध्ये सुरुवात झाली होती.

मात्र, काही काळानंतर या योजनेतील गैरव्यवहार समोर आला होता. सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील खान्देश बिल्डर्सला हे काम दिले. या ठेकेदाराला नियमबाह्य़ पध्दतीने सुमारे २९ कोटी रुपये बिनव्याजी आगाऊ देण्यात आले. इतकेच नव्हे, तर ठेकेदारास विविध सुविधा देण्यात आल्या.

तसेच निविदेतील काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराने पाळली नाही. उपरोक्त कामास पाच वर्षांहून अधिक विलंब करणाऱ्या ठेकेदारावर सत्ताधारी गटाने कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यान बिनव्याजी रक्कम वापरण्याला सातत्याने मुदतवाढ दिल्याने पालिका कर्जाच्या खाईत लोटली गेली. अखेर महापालिकेचे तत्कालिन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कठोर पावले उचलत ३ फेब्रुवारी २००६ रोजी  घरकुल योजनेत २९ कोटी ५९ लाख नऊ हजार रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार दाखल केली होती.

संशयितांचे राजकीय वजन, त्यांचा दबाव, पोलीस अधिकाऱ्यांची चालढकल, तपासी अधिकाऱ्यांच्या बदल्या यामुळे हे प्रकरण अनेक वर्षे लांबले होते.