धुळ्यातील स्फोटामागे घातपात? एटीएस पथक तपासासाठी घटनास्थळी दाखल

स्फोटाचा आवाज सुमारे १५ किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. आसपासच्या शेतात काम करणारे काही शेतमजूरही या स्फोटामुळे जखमी झाले.

Updated: Aug 31, 2019, 02:03 PM IST
धुळ्यातील स्फोटामागे घातपात? एटीएस पथक तपासासाठी घटनास्थळी दाखल title=

धुळे: शिरपूरच्या वाघाडी गावाजवळ असणाऱ्या रूमित केमिकल्स कंपनीत झालेल्या भीषण स्फोटामागे घातपात असल्याची शक्यता दिसत आहे. कारण याठिकाणची परिस्थिती काहीप्रमाणात नियंत्रण आल्यानंतर दहशतवादीविरोधी पथक (एटीएस) आणि साध्या वेषातील काही पोलीस याठिकाणी तपासासाठी दाखल झाले आहेत. मात्र, त्यांनी याबाबत स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. 
 
 रुमित केमिकल्स कंपनीत शनिवारी सकाळी भीषण स्फोट झाला. यामध्ये आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी आहेत. यामध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे समजते. तर आणखी काही मृतदेह कंपनीच्या इमारतीमध्येच पडून असल्याची शक्यता आहे. हा स्फोट इतका जोरदार होता की, स्फोटानंतर इमारतीचा केवळ सांगाडाच उरला आहे. त्यामुळे याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले आहेत. स्फोटाचा आवाज सुमारे १५ किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. आसपासच्या शेतात काम करणारे काही शेतमजूरही या स्फोटामुळे जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. 
 
 अग्निशमन दलाकडून सध्या कंपनीच्या इमारतीमधील आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, याठिकाणी असलेल्या आणखी काही बॉयलर्सचा स्फोट होण्याची शक्यता असल्याने बचावकार्य मध्यंतरी थांबवण्यात आले होते. काहीवेळातच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकही (एनडीआरएफ) याठिकाणी दाखल होईल. 
 
 या फॅक्टरीत सहा बॉयलर असून आतापर्यंत चार बॉयलरचे स्फोट झाले आहेत. सुरक्षेच्या कारणाने आसपारच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. 
 
 हा स्फोट नेमका कशामुळे झाला आणि या केमिकल कंपनीचे मालक कोण आहेत, याबाबत कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. मात्र, इतक्या घातक रसायनांच्या कारखान्यात सुरक्षेची पुरेशी काळजी का घेतली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.