काळ आई-मुलासोबत एवढा निष्ठूरतेनं का वागला? असं कुणासोबतच घडू नये

जगात कोणत्याच आई-मुलासोबत असं घडू नये...    

Updated: Mar 5, 2021, 04:16 PM IST
काळ आई-मुलासोबत एवढा निष्ठूरतेनं का वागला? असं कुणासोबतच घडू नये title=

वाल्मीक जोशी, झी मीडिया, जळगाव: काळ कधी कुठे आणि कसा गाठेल याचा नेम नाही म्हणतात ना अगदी तसंच झालं. आई आणि मुलाला काळानं गाठलं आणि दुर्देव म्हणजे दोघांच्याही अंत्ययात्रा एकाच वेळी निघाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे.

जळगावमधील एरंडोल इथे ही धक्कादायक घटना घडली. चंदनबर्डी इथे जिल्हापरिषद शाळेत कामासाठी जात असताना गाडीचा अपघात झाला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या भीषण अपघातात आई-मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद शाळेत कर्तव्य बजावायला जात असताना ही दु:खद घटना घडली. 

राष्ट्रीय महामार्गावर काम सुरू असल्याने रस्त्यावर पसरलेल्या खडीवरून दुचाकी घसरून हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. शिक्षिका कविता कृष्णकांत चौधरी आणि त्यांचा मुलगा लावण्य या दोघांचाही अपघातात मृत्यू झाला. 

गाडी घसरल्यानं गाडीवर असलेला लावण्य फेकला गेला आणि तो ट्रकच्या चाकात आला. ही दुर्घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर एरंडोल धारागीर दरम्यान हॉटेल फाउंटन जवळ घडली. 

शिक्षिका कविता कृष्णकांत चौधरी या दुचाकीवरून त्यांच्या मुलाला घेऊन शाळेत निघाल्या होत्या. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर चंदन बर्डी  येथे शाळेत जाण्यासाठी निघाल्या असताना महामार्गावर खडी गाडीखाली आल्यानं हा अपघात झाला. या अपघातात पुढे चालणाऱ्या ट्रकला गाडी धडकली. शिक्षिका मुलासह ट्रकच्या मागच्या चाकात अडकून त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा परिसरली आहे.