Samruddhi Highway : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे आज, शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याहस्ते होणार उद्घाटन होणार आहे. शिर्डी (Shirdi) ते भरवीर या 82 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाल्याने नाशिक (Nashik) ते शिर्डी हे अंतर जलदगतीने पार करता येणार आहे. मात्र हे अंतर पार करताना नागरिकांना तीनदा टोल द्यावा लागणार आहे. 82 किमीच्या अंतरात तीन टोल नाक्यांचा समावेश आहे.
कसा आहे दुसरा टप्पा?
शिर्डी ते भरवीर या 82 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्यात 7 मोठे पूल, 18 छोटे पूल, वाहनांसाठी 30 भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी 23 भुयारी मार्ग, 3 टोल प्लाझावरील तीन इंटरचेंज, 56 टोल बूथ, 6 वे ब्रिज आदी सुविधांचा समावेश आहे. पॅकेज क्र 11,12 आणि 13 चे इगतपुरी तालुक्यामधील भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचा खर्च 3200 कोटी रुपये एवढा असून लांबी 82 कि मी आहे. या दुसऱ्या टप्याच्या उद्घाटनानंतर 701 किमी पैकी आता एकूण 600 किमी लांबीचा समृध्दी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
कोणाला होणार फायदा?
या दुसऱ्या टप्प्यातील महामार्गाचा सिन्नर येथील गोंदे इंटरचेंज येथून नाशिक, अहमदनगर, पुणे व त्या भागातील इतर गावांना फायदा होणार आहे. भरवीरपासून घोटी हे अंतर 17 किमी अंतरावर आहे. नाशिक, ठाणे, मुंबई येथून शिर्डीला जाणाऱ्यांचा प्रवास आणखी जलद होणार आहे. यासोबत शिर्डी, अहमदनगर व सिन्नर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतमाल या महामार्गावरुन आणखी लवकर मुंबईत येणार आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्ह्यांच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणारा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी केले होते. हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर 10 तासांऐवजी फक्त पाच तासातच कापणे शक्य झाले आहे.
39 जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत या महामार्गावर ३58 अपघात घडले असून, यामध्ये 39 जणांचा मृत्यू झाला आहे. जीव गमावला आहे. तर 143 जण या अपघातांमध्ये गंभीर जखमी झाले आहेत.