...तर मी भाजपात प्रवेश करेन, राज्यमंत्री बच्चू कडू यांचं मोठं विधान

 कृषी विधेयक धोरण विधेयकाच्या पार्श्वभुमीवर विधान

Updated: Oct 5, 2020, 08:40 AM IST

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांनी आणलेल्या कृषी विधेयक कायद्यात माझ्या दोन अटी मान्य केल्यास मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं मोठं विधान शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलं आहे. केंद्र सरकारने नुकतेच काही दिवसांपूर्वी कृषी विधेयक धोरण देशात लागू केले आहे. या पार्श्वभुमीवर बच्चू कडू यांनी हे विधान केलंय. या धोरणाअंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समिती बाहेर कुठेही शेतमाल विकता येणार आहे. 

त्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्यास केंद्र सरकारचे म्हणणे आहे. दरम्यान या कायद्याला काँग्रेससह आदी पक्षांनी विरोध केला केला. शिवसेनेने या विधेयकाला पाठींबा दिला होता. मात्र राज्यभेत  सभात्याग केला. 

दरम्यान या कृषी विधेयकावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना ५० टक्के नफा मिळवून भाव देण्याचे आश्वासन दिले होते. ५० टक्के नफा धरुन हमीभाव शेतकऱ्यांना गेल्या १० वर्षात मिळालेला नाही. 

कृषी विधेयकांद्वारे शेतकऱ्यांना ताकद द्यायची असेल, शेतकऱ्यांविषयी सद्भावना असेल तर मोदी सरकारने कृषी कायद्यांमध्ये शेतमालाला ५० टक्के नफा धरुन हमीभाव जाहीर करणे आणि हमीभावानूसार शेतमाल खरेदी करणे, या दोन वाक्यांच्या समावेश करावा. मोदी सरकारने या दोन वाक्यांचा कृषी कायद्यात समावेश केल्यास भाजपमध्ये प्रवेश करु, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

शाळा सुरु करणार 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शासकीय खाजगी शाळा महाविद्यालय अद्यापही बंद आहे. परंतु दिवाळी नंतर राज्यातील वर्ग ९ ते १२ वी पर्यत शाळा सुरू करणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंत्री बच्चू यांनी दिली. कोरोना काळातील सर्व नियम अटी ठेवूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिल्या जाणार आहे असही शिक्षण राज्यमंत्री बच्चू म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊन मध्ये आता राज्यात अनलॉक सुरू आहे. जवळपास सर्व बाबी या खुल्या करण्यात आल्या असल्या तरी मंदिरे आणि विद्यामंदिरे अजूनही बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी दिवाळी नंतर राज्यातील ९ ते १२ पर्यत शाळा सुरू करणार असल्याचे ते म्हणाले.

या शाळा सुरु करत असताना सरकारच्या वतीने एक चांगल धोरण आखण्यात येईल. या धोरणाच्या माध्यमातून कोणीही कोरोनाने बाधित होणार नाही आणि शिक्षणही व्यवस्थित दिल्या जाईल अशा प्रकारची भूमिका ही सरकारची आहे. जर एखाद्या शिक्षकाचे वय ५० च्या पुढे असेल तर शिक्षकच्या ऐवजी दूसऱ्या शिक्षकाला तिथे घेता येईल का. तसेच बाधित मुलं शाळेत येऊ नये या साठी विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करता येईल का असाही विचार सुरू असल्याचे बच्चू कडू म्हणाले.