साताऱ्याच्या पोटनिवडणुकीसाठी शरद पवार उभे राहिले तर माघार घेईन- उदयनराजे

राजेशाही असतील तर मी बलात्कार करणाऱ्यांना थेट गोळ्या घातल्या असत्या.

Updated: Sep 24, 2019, 03:16 PM IST
साताऱ्याच्या पोटनिवडणुकीसाठी शरद पवार उभे राहिले तर माघार घेईन- उदयनराजे title=

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा: सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शरद पवार उभे राहिले तर आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेऊ, असे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले. ते मंगळवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधकांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या सर्वांना उदयनराजे भोसले यांनी चांगलेच धारेवर धरले. त्यांनी म्हटले की, हे सर्व एकदाचे खलास करून टाका. शरद पवार साताऱ्यातील पोटनिवडणुकीला उभे राहिले तर मी अर्ज भरणार नाही. मला केवळ दिल्लीतील बंगला आणि गाडी द्यावी, अशी अट उदयनराजेंनी घातली. 

तसेच शरद पवार आपल्यासाठी अजूनही आदरणीय असल्याचे उदयनराजेंनी म्हटले. माझे वडील गेल्यानंतर शरद पवार यांनीच मला आधार दिला. ते पोटनिवडणुकीसाठी उभे राहिले तर बरेच होईल. म्हणजे मी बोंबलत फिरायला मोकळा होईन, असे उदयनराजेंनी म्हटले. 

विरोधकांनी माझ्यावर राजेशाहीचा आरोप करण्यापेक्षा मुद्द्यांवर आधारित राजकारण करावे. राजेशाही असतील तर मी बलात्कार करणाऱ्यांना थेट गोळ्या घातल्या असत्या, असे उदयनराजे यांनी म्हटले.

उठसूट कोणाचेही ऐकून घ्यायला मी हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. ऐन तारूण्यात मी तुरुंगात गेलो. मात्र, आपण नेहमी अन्यायाच्याविरोधात आवाज उठवला, असे प्रत्युत्तर उदयनराजेंनी टीकाकारांना दिले. 

तसेच माझी स्टाईल हा खासगी प्रश्न आहे. मला गाणी ऐकायला आवडतात. कॉलर माझी आहे, मी ती चावीन नाहीतर फाडून टाकेन. तुम्हाला त्याच्याशी काय देणेघेणे आहे, असा सवालही उदयनराजेंनी विचारला. 

२१ ऑक्टोबरला विधानसभेच्या निवडणुकांसोबतच साताऱ्याची पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या घोषणेमुळे उदयनराजे भोसले यांना मोठा दिलासा मिळाला आहे.