Gautami Patil : वाढदिवस बायकोचा, हौस नवऱ्याची, चर्चा गौतमी पाटीलची... सेलिब्रेशनचा नाद खुळा

Gautami Patil : बीड येथील एका व्यक्तीने आपल्या बायकोच्या वाढदिवसानिमित्ताने चक्क गौतमी पाटीलचा डान्स शो ठेवला होता. या कार्यक्रमाला तुफान गर्दी  झाली होती.  या कार्यक्रमाला भाजपचे आमदार सुरेश धस हे सुद्धा उपस्थित होते. 

Updated: Mar 20, 2023, 06:08 PM IST
Gautami Patil : वाढदिवस बायकोचा, हौस नवऱ्याची, चर्चा गौतमी पाटीलची... सेलिब्रेशनचा नाद खुळा title=

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : काही दिवसांपूर्वी एका पित्याने आपल्या मुलाच्या वाढदिवसा निमित्ताने गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजीत केला होता. त्यानंतर आता एका पठ्ठ्याने आपल्या बायकोच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात गौतमीला नाचवले. बीडमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती. वाढदिवस बायकोचा, हौस नवऱ्याची चर्चा मात्र गौतमी पाटीलची (Gautami Patil) झाली.  हे नाद खुळं सेलिब्रेशन पाहून सगळेच चाट पडले आहेत. 

दिवसेंदिवस गौतमी पाटलाच्या लावणीची चर्चा राज्यभरात होत आहे. प्रत्येकाला गौतमी पाटीलच्या लावणीची भुरळ पडत आहे. कुठलाही कार्यक्रम असो गौतमी पाटलील आणायचं अशी अनेकांची इच्छा असते. यातूनच बीड येथील एका व्यक्तीने आपल्या बायकोच्या वाढदिवसानिमित्ताने चक्क गौतमी पाटीलचा डान्स शो ठेवला होता. या कार्यक्रमाला तुफान गर्दी  झाली होती.  या कार्यक्रमाला भाजपचे आमदार सुरेश धस हे सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे गौतमी पाटलांच्या या कार्यक्रमाची बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रभरात चर्चा होत आहे. 

वाढदिवस साजरा करण्याचा सध्या अनोखा ट्रेंड सुरू झाला आहे. आष्टी तालुक्यातील निमगाव बोडखा येथील किरण गावडे यांनी पत्नी प्रगती गावडे यांचा वाढदिवस सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पत्नीच्या वाढदिवसानिमित्त चक्क नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम घेण्यात आला. 

एखाद्या महिलेच्या वाढदिवसानिमित्त  गौतमी पाटीलचा शो हा राज्यातला पहिलाच प्रयोग ठरला आहे. गौतमी पाटील हिच्या हस्ते केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. या अनोख्या वाढदिवसाला भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील हजेरी लावली होती. 

आमदार सुरेश धस यांना देखील हे कार्यक्रम पाहण्याचं निमंत्रण होतं त्यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली. आपल्या पत्नीच्या प्रेमापोटी आणि पत्नीच्या सांगण्यावरून आपण नृत्यांगना गौतमी पाटील हिला आपल्या गावामध्ये आणल्याचं किरण गावडे यांनी सांगितले.

वाढदिवसानिमित्त पत्नीला अनोखी भेट देता यावी यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  त्यामध्येच गौतमी पाटीलच्या लावणीचे आयोजन व्हावं अशी पत्नीची मागणी होती त्यामुळे या कार्यक्रमाचा आयोजन केला असल्याचं किरण गावडे म्हणाले. आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटलाच्या डान्सचा कार्यक्रम ठेवला असल्याचं गावडे यांनी सांगितले असलं तरी देखील या कार्यक्रमाची चर्चा बीड जिल्ह्यासह राज्यभरात होत आहे.