गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेले चाकरमानी अडकले; मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Ganeshoutsav 2023 : गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीमुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.

आकाश नेटके | Updated: Sep 16, 2023, 02:12 PM IST
गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेले चाकरमानी अडकले; मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी title=

Mumbai Goa highway : अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी (ganeshoutsav 2023) चाकरमान्यांनी कोकणाकडे (Kokan) धाव घेतली आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Mahamarg) प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक कोकणाकडे निघाल्याने मुंबई गोवा महामार्गावर माणगाव बाजारपेठेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोकणात जाणाऱ्या मार्गावर 4 ते 5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात निघालेले असताना माणगावजवळ बाजारपेठ परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. बाजारपेठ परिसरातच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. माणगाव बस स्थानकात पुणे आणि श्रीवर्धन जोड रस्ता त्याच बरोबर बाजारपेठ असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

तसेच मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण बहादुर शेख नाका परिसरात देखील मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण मधील बहादुर शेख नाका परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. उड्डाण पुलाच्या गर्डरच्या कामामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. निमुळत्या रस्त्यामुळे बहादुर शेख नक्यातली वाहतूक कोंडी गणेशोत्सव काळात डोकेदुखी ठरत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बहादुर शेख नाक्यात वाहतूक पोलिसांची गरज निर्माण झाली आहे.

मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक सुरुच

मुंबई-गोवामहामार्गावर गौरी गणपती सणाच्या कालावधीत अवजड वाहनांच्या वाहतुकीला 30 सप्टेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली होती. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले होते. मात्र बंदी आदेश झुगारून मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न पार पडावा यासाठी मुंबई गोवा महामार्गावर आजपासून अवजड वाहनाच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली होती. मात्र तरी देखील अवजड वाहनांची वाहतूक महामार्गावरून सुरू आहे. प्रशासनाच्या बंदी आदेशाला वाहन चालकांनी केराची टोपली दाखवली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती.