सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : प्रेमात एकमेकांसाठी जीव देण्यासाठी जोडपी तयार असतात असं म्हटलं जातं. मात्र प्रत्यक्षात असं कोणी काही करेल असं वाटत नाही. मात्र पुण्यात (Pune Crime) एका प्रियकरामुळे त्याच्या प्रेयसीला स्वतःचा जीव द्यावा लागला आहे. प्रियकरासाठी काढलेल्या कर्जाचे हफ्ते न फेडल्याने प्रेयसीने स्वतःला संपवलं आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
प्रियकराच्या सांगण्यावरून प्रेयसीने तीन लाख 75 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते प्रियकर फेडणार होता. मात्र आश्वासन देऊनही प्रियकराने कर्ज न फेडल्याने 25 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. हडपसर परिसरातील मांजरीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आदर्श अजयकुमार मेनन (वय 25) याला अटक करण्यात आली आहे. तर राणी उर्फ रसिका रवींद्र दिवटे (वय 25) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
राणी आणि आरोपी आदर्श या दोघांचे प्रेमसंबंध होते. आरोपी प्रियकराच्या सांगण्यावरून मयत तरुणीने वेळोवेळी क्रेडिट कार्डवरुन पर्सनल लोन आणि इतर पाच ते सहा लोन ॲपवरून तीन लाख 75 हजार रुपये कर्ज घेतले होते. ते पैसे प्रेयसीने आदर्शला खर्च करण्यासाठी दिले होते. या कर्जाचे हप्ते आरोपी आदर्श फेडणार होता. मात्र त्याने ते वेळोवेळी कर्जाचे हफ्ते फेडलेच नाही. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार भांडण देखील झाले होते. याचाच मानसिक त्रास झाल्याने रसिका हिने 14 सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.