घागरभर पाण्यासाठी महिला सरपंचाची वणवण भटकंती

गावच्या कारभाऱ्याला सुध्दा दुष्काळाचा फटका 

Updated: May 29, 2019, 01:05 PM IST
घागरभर पाण्यासाठी महिला सरपंचाची वणवण भटकंती title=

मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा भयंकर वाढल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी येथील सामान्य जनतेलाच नव्हे तर महिला सरपंचालाही एक घागरभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. गुन्हेगाराचा शिक्का बसलेल्या पारधी समाजातील गंगाबाई पवार या लोकशाहीच्या मार्गाने शेळका धानोरा येथील सरपंच झाल्या. मात्र सरपंच महिलेला चक्क पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्यामुळे गावच्या कारभाऱ्याला सुध्दा दुष्काळाचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. चोरी आणि पारधी असं समाजात समिकरण रुजल्यामुळे हा चोरीचा शिक्का पुसण्यासाठी पारधी समाज मोल मजुरी करुन उदरनिर्वाह करीत आहे. मात्र या वर्षी भीषण दुष्काळ असल्यामुळे शेळका धानोरा येथील पारधी समाजातील युवक हे बाहेर गावी गेले आहेत. उरलेले गावातच मोलमजुरी करून जगत आहेत.

शेळका धानोरा ग्रामपंचायत अंतर्गत एक पारधी पिढी आहे. ही पिढी गावाच्या बाहेर आहे. येथे १५० च्या आसपास लोक राहतात. ग्रामपंचायत या पिढीला दहा दिवसातून एकदा अल्प प्रमाणात पाणी पुरवठा करत आहे. या पिढीजवळ एक विहीर आहे ती सुद्धा कोरडी पडली आहे. येथील सरपंच गंगाबाई नाना पवार यादेखील याच पारधी पिढीवर राहतात. गावची कारभारी असताना त्यांनाही एक घागरभर पाण्यासाठी तब्बल २ किमी उन्हात जावं लागतंय. मात्र तेथेही एक हंडा भरण्यासाठी वेळ जातो. गाव कारभारी म्हणून गावचा कामकाज पाहायचा सोडून अन्य महिलांसोबत त्यांचीही भटकंती होत आहे. 

शेळका धानोरा येथे जलस्वराज्य योजना राबविण्यात आली आहे. या योजनेतील उध्दभव विहीरीमध्ये पाणी नसल्यामुळे पाणी पुरवठा योजना बंद पडली आहे. सध्या गावात ग्रामपंचायतचे चार बोअरवेल आहेत. यातील दोन बोअरवेलला पाणी आहे. सध्या एक अधिग्रहण करण्यात आले आहे. मात्र हे पाणी कमी पडत असल्यामुळे ग्रामस्थांचा पाण्यासाठी आता संघर्ष सुरू झाला आहे. महिलांचा पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष सुरू आहे.

आरक्षण सुटल्याने पारधी समाजातील महिला सरपंच झाली. गावच्या सर्वोच्च पदावर पोहचली. पारधी समाजातील महिला सरपंच झाली म्हणून पिढीवर जल्लोष झाला. आपल्या अंधारमय जगात आता प्रकाश येणार ही भाबडी अशी आशा या लोकांमध्ये होती. मात्र बदललं काहीच नाही उलट दुष्काळामुळे हा समाज होरपळून निघालाय. यांच्या व्यथा त्याच आहेत ज्या पूर्वी होत्या. किंबहुना त्यापेक्षा जास्त वाढल्या असतील.