...या दुष्काळी गावात दिसतोय फ्लेमिंगो, स्पून बिलचाही विहार

पाणी टंचाईसाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या मनमाडच्या वागदर्डी धरणात चक्क फ्लेमिंगोंचं आगमन झालंय. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून फ्लेमिंगोंचा मनमाडमध्ये विहार आहे. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलीय. 

Updated: Jul 14, 2017, 07:58 PM IST
...या दुष्काळी गावात दिसतोय फ्लेमिंगो, स्पून बिलचाही विहार title=

निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड : पाणी टंचाईसाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या मनमाडच्या वागदर्डी धरणात चक्क फ्लेमिंगोंचं आगमन झालंय. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून फ्लेमिंगोंचा मनमाडमध्ये विहार आहे. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलीय. 

मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरण परिसरात पाणकावळे, ग्रे हेरॉन, राखी बगळे, काळा शेराटी, पांढरा शेराटी, कॉमनकूट, पाणकोंबडी आणि टिटवी पक्षांचं वास्तव आहे. यंदा मात्र, फ्लेमिंगो आणि स्पून बिल या दोन परदेशी पक्षांची त्यात भर पडलीय.

फ्लेमिंगो हा परदेशी पाहुणा प्रामुख्यानं नाशिक जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर आणि गंगापूर धरणात पाहायला मिळतो. मात्र, पहिल्यांदाच मनमाडच्या वागदर्डी धरणात त्याचं आगमन झालंय. स्थलांतरित पक्षी असलेल्या मोठा रोहित जातीचा फ्लेमिंगो हिवाळ्याच्या प्रारंभी अन्नाच्या शोधात हजारो किलोमीटरचा प्रवास करुन येतो. हिवाळा संपताच त्याचा परतीचा प्रवास सुरु होते. आता त्यांचा मनमाडमध्ये विहार आहे. पक्षीप्रेमींसाठी ही पर्वणीच ठरतेय. 

वागदर्डी धरणाच्या पाण्यात जैववैधता आणि पाण्यात असलेल्या शेवाळ्यामध्ये फ्लेमिंगोचं आवडतं खाद्य असल्यानं ते याठिकाणी मुक्कामाला थांबलेत. ज्या गावात पिण्याच्या पाण्याचं मोठं दुर्भिक्ष आहे. तिथं या परदेशी पाहुण्यांनी विहार केल्यानं याचं अप्रुप अधिक आहे.