लातूर : जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील मांजरा नदीच्या परिसरातील गुरनाळ गावच्या शिवारात आणखी एक मगर सापडल्याने खळबळ उडाली आहे. रात्रीच्या सुमारास ही सहा फुटी मगर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झुडपात आढळून आली. त्यानंतर ग्रामस्थांनी उदगीरच्या वन्यजीव रक्षकांना बोलावले. ज्यात बाबा सय्यद, दीपक कासराळे, श्याम पिंपळे यांचा समावेश होता. या मगरीला बाहेर काढताना बाबा सय्यद यांच्या हाताला मगरीने चावा घेतला. मात्र किरकोळ दुखापत झाल्यानंतरही या तिघानीही ८० किलोच्या या मगरीला पकडून, बांधून ठेवले.
त्यानंतर वनविभागाच्या ताब्यात ही मगर देण्यात आली. गेल्या काही महिन्यात सापडलेली ही चौथी मगर आहे. देवणी तालुक्यातील विजयनगर, देवणी खुर्द आणि गुरनाळ मध्येच पूर्वी मगर सापडल्या होत्या. मांजरा नदीच्या पात्रात प्रवाहाच्या उलट्या दिशेने प्रवास करून या मगरी तेलंगणा-आंध्र प्रदेशातून आल्या असाव्यात असा वनविभागाचा अंदाज आहे. मात्र सातत्याने देवणी तालुक्यात मगर सापडत असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.