मुंबई : राज्यात अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमुळे (andheri bypoll election) राजकीय वातावरण तापलं आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) तर्फे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (rutuja latke) आणि भाजपतर्फे (BJP) मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, याआधीही ठाकरे गट (uddhav thackeray) आणि शिंदे गट (CM Eknath Shinde) या दोघांमध्ये निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या नावावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. हा वाद निवडणूक आयोगाकडे (election commission) गेल्यानंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्हीही गोठवण्यात आलं. त्यानंतर ठाकरे गटासाठी शिवसेना (Shivsena) ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आणि मशाल हे चिन्ह देण्यात आलं. तर शिंदे गटासाठी बाळासाहेबांची शिवसेना हे नाव तर ढाल तलवार ही चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे.
निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या शिवसेनेला दिलेल्या ‘धगधगती मशाल’ या चिन्हावर समता पक्षाने काही दिवसांपूर्वी आक्षेप घेतला. अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला मशाल चिन्ह देऊ नये, अशी मागणी समता पक्षाने केली आहे. त्याबाबत समता पक्षाकडून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. यानंतर आता शिंदे गटाचीही चिंता वाढण्याची शक्यता आहे. कारण शिंदे गटाला देण्यात आलेल्या चिन्हावरही आता आक्षेप घेण्यात आला आहे.
शिंदे गटाची निशाणी असलेल्या ढाल तलवारवर नांदेडमधील सचखंड गुरुद्वाराच्या माजी सदस्याने आक्षेप घेतलाय. ढाल तलवार ही धार्मिक निशाणी असल्याचा दावा करत हा आक्षेप घेण्यात आलाय. त्यामुळे आता शिंदे गटाची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
"ढाल तलवार ही शिखांची धार्मिक निशाणी आहे. श्री गुरु गोविंदसिंग यांनी जेव्हा खालसा धर्माची स्थापना केली त्यावेळी ढाल तलवार रक्षणासाठी अर्पण केली होती. शिखांच्या पाचही तख्तांवर रोज ढाल तलवारीचे पूजन केले जाते. त्यामुळे हे निवडणूक चिन्ह म्हणून देऊ नये", अशी मागणी गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य सरदार रणजितसिंग यांनी केली आहे. मुख्य निवडणूक आयोग, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना याबाबत मेलद्वारे आक्षेप घेणारे पत्र पाठवण्यात आल्याचे रणजितसिंग कामठेकर यांनी सांगितले आहे.