Eknath Khadse: महायुतीनं बहुमत मिळवत राज्यात सत्ता स्थापन करताच आता अनेकांना शिवसेनेसह भाजपमध्ये पुन्हा परतण्याची घाई झालीय. निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीमध्ये गेलेले एकनाथ खडसे भाजपमध्ये दाखल होणार होते मात्र त्यांची तळ्यात मळ्यात स्थिती होती. आता फडणवीस यांच्यासोबत एकनाथ खडसेंनी दिलजमाईचे संकेत दिलेत. त्यामुळे पुन्हा एकदा खमंग राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.
युतीच्या काळामध्ये भाजपा सेना सत्तेवर असताना एकनाथ खडसे आणि विनोद तावडेंचं भाजपावर वर्चस्व होतं. नागपुरातून हळूहळू देवेंद्र फडणवीस यांनी आपलं वर्चस्व मिळवण्यास सुरुवात केली आणि थेट मुख्यमंत्री झाले आणि इथंच वादाची ठिणगी पडली. एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना सातत्यानं फडणवीस आणि खडसे यांच्यामध्ये खटके उडत होते. खडसे फडणवीसांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते. याच स्पर्धेतून फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना जवळ केलं.
फडणवीसच नाही तर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर टीका करणाऱ्या खडसे यांना अडचणीत आणण्यासाठी यांच्या जमिनीच्या व्यवहारांची चौकशी सुरू झाली आणि त्यांचे जवळील नातेवाईक कारागृहात डांबले गेले. टोकाचा विरोध झाल्याने खडसे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी मध्ये जाणे पसंत केले. मात्र आता येणारी पाच वर्ष भाजपाचे वर्चस्व संपूर्णपणे दिसून आल्यानंतर खडसे यांनी नरमाईचे धोरण स्वीकारलंय. फडणवीस यांच्याशी जुळवून घेण्याचे संकेत दिले. फडणवीसांशी संबंध चांगले आहेत. त्यांच्याशी आजही बोलतो, असा खुलासाही एकनाथ खडसेंनी केलाय.
खरंतर निवडणुकीपूर्वीच खडसे यांचे भाजप प्रवेशाचे वारे सुरू झाले होते. दिल्लीतून विनोद तावडे असल्याने त्यांना ग्रीन सिग्नल मिळाला होता. एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये तसेच जाहीरही केले. मात्र त्यांच्याच मतदारसंघाजवळ असलेल्या जामनेर मतदारसंघातील गिरीश महाजन यांचा विरोध आणि देवेंद्र फडणवीस यांना विश्वासात न घेतल्यामुळे भाजपा राज्यामध्ये नाराजी पसरली होती. परिणामी खडसे यांनीही कुंपणावर थांबणे पसंत केले.
आता भविष्यातील चित्र स्पष्ट झालंय. राज्यामध्ये फडणवीसांची सत्ता आणि त्यांचं वर्चस्व कायम असणार आहे. हे बघून अधिक नरमाईचं धोरण स्वीकारत खडसे यांनी एकदा पुन्हा भाजप प्रवेशाचे सूर आळवायला सुरुवात केली आहे.