Rohit Pawar ED Raid : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने नोटीस बजावली आहे. बारामती अॅग्रो कंपनी तसेच खासगी कंपन्या या संबंधित व्यवहार संदर्भात ही नोटीस पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुढील आठवड्यात रोहित पवार यांना ED चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आधी रोहित पवार यांच्या कारखान्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली होती. तसेच त्यांची चौकशी देखील झाली होती.
यापूर्वी बारामती अॅग्रोवर ईडीनं छापेमारी केली होती.आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर ED नं छापेमारी केली होती. पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. ईडीच्या पथकाने एकूण 6 ठिकाणी धाडसत्र राबवले होते. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली होती. त्याचसोबत रोहित पवारांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड साखर कारखान्यावरही आयकर खात्याने छापे मारले होते.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला होता. बारामती ऍग्रो कंपनीविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेले आदेश उच्च न्यायालयानं रद्द केले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळांन बारामती अॅग्रो कंपनीचे दोन प्लांट रद्द करय़ाचे आदेश दिले होते. त्यावरोधात रोहित पवारांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हापासूनच रोहित पवार यांची बारामती अॅग्रो कंपनी चर्चेत होती.
रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. अजित पवार यांचा एक मोठा गट शिंदे - फडणवीस यांच्यासह सरसकारमध्ये सहभागी झाली. अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली. मात्र, रोहित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही. रोहित पवार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासह आहेत.