मृतदेह सडले, कुजले,अळ्या, किडे लागले आणि.... घाणेरड्या दुर्गंधीमुळे नाशिककरांना श्वास घेणे कठीण झालेय

अनेक मृतदेहांना अळ्या आणि किडे लागलेत. उघड्या डोळ्यांनी आपण पाहूसुद्धा शकत नाहीत इतकी विचलित करणारी ही दृश्य येथे  पहायला मिळत आहेत. 

Updated: Nov 24, 2022, 06:26 PM IST
मृतदेह सडले, कुजले,अळ्या, किडे लागले आणि.... घाणेरड्या दुर्गंधीमुळे नाशिककरांना श्वास घेणे कठीण झालेय title=

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक :  नाशिक जिल्हा रुग्णालयातील(Nashik District Hospital) शवागाराची वातानुकुलीत यंत्रणा अर्थात एसी यंत्रणा बंद पडल्या आहेत(Disrepair of Mortuary). यामुळे शवागारातील मृतदेहांची अवहेलना होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक मृतदेह येथे 80 ते 90 दिवस पडून असल्याने ते कुजले आहेत. परिणामी परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे.  कुजलेल्या मृतदेहांमधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून परिसरातील नागरिक आणि रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून हे शवागार अत्यंत दयनीय अवस्थेत  आहे.

मात्र, कागदी घोडे नाचविण्यापलीकडे यंत्रणा काहीच करत नसल्याने मृत्यूनंतरही शवागारातील मृतदेहांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. उघड्या डोळ्यांनी आपण पाहूसुद्धा शकत नाहीत इतकी विचलित करणारी ही दृश्य या शवागरात पहायला मिळत आहेत.

नाशिक जिल्हा रुग्णालयातील शवागृहाची एसी यंत्रणा दोन-अडीच वर्षांपासून बंद आहे. शवागारातील शवपेट्याही खराब झाल्या आहेत. मात्र तरीही या बंद अवस्थेतील शवागारात मृतदेह ठेवण्यात येत असल्याने या मृतदेहांना अळ्या आणि किडे लागल्यानं ते कुजले आहेत. 

अक्षरशः काही मृतदेहांचा केवळ हाडांचा सापळाच शिल्लक राहिला असून, इतकी बिकट परिस्थिती होऊनही यंत्रणा याकडे लक्ष देताना दिसत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.