पुणे : पंढरीच्या वारीसाठी देहूआळंदीमध्ये भाविक दाखल होऊ लागलेत. आज तुकोबारायांची पालखी पंढरीच्या वारीसाठी प्रस्थान ठेवणारे. राज्याच्या कानाकोप-यात लाखो भाविक वारीचा अनुभव घेण्यासाठी उत्सूक असतात. पालखी सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. मोठा बंदोबस्त या वेळी असणार आहे. राज्याच्या विविध भागातून लाखो भाविक वारीसाठी येत असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं पोलीस उपअधीक्षक जी एस माडगूळकर यांनी सांगितलं आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं प्रस्थान गुरुवारी आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा शुक्रवारी प्रस्थान ठेवणार आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी आळंदीनगरी सजू लागली आहे. वारक-यांची लगबग अलंकापुरीत वाढू लागली आहे. अधिकमासामुळे महिनाभर यंदाचा सोहळा लांबला आहे. त्यामुळे वारक-यांची यावेळी संख्या वाढेल असा अंदाज आहे. आळंदी देवस्थानतर्फे पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.