भीमा नदीत एकापाठोपाठ चार मृतदेह तरंगत आले, पोलीसही हैराण झाले... धक्कादायक खुलासा

Daund Crime News : गेल्या काही दिवसांपासून भीमा नदी पात्रात चार मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणी आजूबाजूला तपास सुरु केला होता. तपासामध्ये हे मृतदेह एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे.

Updated: Jan 24, 2023, 02:35 PM IST
भीमा नदीत एकापाठोपाठ चार मृतदेह तरंगत आले, पोलीसही हैराण झाले... धक्कादायक खुलासा title=
(फोटो सौजन्य - PTI)

जावेद मुलानी, झी मीडिया, दौंड :  पुणे (Pune News) जिल्ह्यातील दौंड (Daund) तालुक्यातील भीमा नदीत (Bima River) चार मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. 18 जानेवारीपासून 22 जानेवारी पर्यंत भीमा नदीत मृतदेह सापडत होते. भीमा नदीत (Daund Crime News) सापडलेले चारही मृतदेह हे 38 ते 40 या वयोगटातील असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. हे सर्व मृतदेह एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर लोकांना मोठा धक्का बसला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमा नदीतील स्थानिक मच्छिमारांना 18 जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर 20 जानेवारी रोजी एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर 21 जानेवारी रोजी पुन्हा एका महिलेचा मृतदेह आढळून आला. पुन्हा दुसऱ्या दिवशी आणखी एका पुरुषाचा मृतदेह मच्छिमारांना सापडला. पाच दिवसांत चार मृतदेह नदीत सापडल्याने स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली. नदीमध्ये सापडलेल्या मृतदेहांमुळे पोलीस खातेही संभ्रमात पडले होते. मात्र सखोल तपास करत पोलिसांनी याप्रकरणाचा शोध लावला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हे सामुहिक आत्महत्येचे प्रकरण असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सापडलेले मृतदेह हे पती पत्नीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आसपासच्या परिसरात चौकशी सुरु केली. यानंतर हे मृतदेह एकाच कुटुंबातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एकाच कुटुंबातील पती-पत्नी, मुलगी आणि जावई यांचे हे चार मृतदेह असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरीकडे याच कुटुंबातील आणखी तीन मुले बेपत्ता असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे या मुलांचे नेमकं काय झाले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मोहन उत्तम पवार, संगिता मोहन पवार, राणी शाम फुलवरे, शाम फुलवरे अशी मृत व्यक्तींची नावे असल्याचे समोर आले आहे. या कुटुंबात  चार वर्षाच्या आतील 3 लहान मुले आहेत. हे कुटुंब मंगळवारी 17 जानेवारी रोजी रात्री अकरानंतर अज्ञात वाहनाने निघोज या गावातून निघाले होते. त्यानंतर ते कुठे गेले याची कोणालाची माहिती नव्हती. दुसऱ्या दिवसापासून अचानक या कुटुंबातील लोकांचे मृतदेह दौंड तालुक्यातील शिरूर - चौफुला रोडवर असलेल्या पारगावच्या भीमा नदीच्या पात्रात सापडू लागले.

दरम्यान, प्रथम दर्शनी हे सामूहिक आत्महत्येचे प्रकरण असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. परंतु ही आत्महत्या आहे की घातपात याचा तपास दौंड पोलीस करीत आहेत. पोलिसांनी सांगितले की, एका मृतदेहाजवळ चावी सापडली होती. तर एका महिलेच्या मृतदेहाजवळ मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने खरेदी केलेले बिल सापडले. चारही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवाल आला आहे. या अहवालावरुन मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.