पनवेल मार्केट येथे खरेदीसाठी मोठी गर्दी, लॉकडाऊनचा फज्जा

 लॉकडाऊनचा नियम धाब्यात बसवून पनवेल मार्केटमध्ये खरेदीसाठी आज पुन्हा गर्दी दिसन येत आहे.  

Updated: May 2, 2020, 02:34 PM IST
पनवेल मार्केट येथे खरेदीसाठी मोठी गर्दी, लॉकडाऊनचा फज्जा title=

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाऊन जारी करण्यात आले. मात्र, लॉकडाऊनचा नियम धाब्यात बसवून पनवेल मार्केटमध्ये खरेदीसाठी आज पुन्हा गर्दी दिसन येत आहे. लॉकडाऊन उठणार अशी चर्चा सुरु झाल्यानंतर ही गर्दी उसळ्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आता दोन आठवड्यांनी लॉकडाऊन कायम करण्यात आले आहे. १७ मेपर्यंत लॉकडाऊन कायम करण्यात आले आहे. दरम्यान, याआधी पनवेल येथील मिरची गल्लीत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.

पनवेलमध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ होत असताना संचारबंदीतही लोक घराबाहेर पडत आहे. पनवेल मार्केटमध्ये पुन्हा गर्दी, संचारबंदी नियमाचे उल्लंघन होत आहे. मात्र, प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिसांकडून काहीही हालचाल होताना दिसत आहे. कोरोनाचा धोका असताना गर्दी रोखण्यास प्रशासनाला अपयश असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या पनवेल परिसरातील कर्मचाऱ्यांची, त्यांच्या कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था न केल्यास ४ मे पासून पनवेलमधील मेडिकल (वैद्यकीय सेवा) वगळता इतर सर्व सेवा बंद करण्याचा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला आहे.

पनवेलकरांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी पनवेल परिसरातील नागरिकांसह व्यापारी संघटना व उद्योजकांनीही हे बंद पाळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. पनवेलमध्ये आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी ८० टक्क्यांहून अधिक रुग्ण मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेत कार्यरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या कर्मचाऱ्यांच्या सेवेबद्दल सर्वांना आदर आहे. परंतु त्यांच्यामुळे कुटुंबातील अन्य सदस्यांना तसेच शेजाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. संपूर्ण परिसरात कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्यता लक्षात घेऊन कडक निर्बंधाची मागणी करण्यात येत आहे.