आधुनिक हिरकणी! ९ महिन्याच्या गर्भवतीने बिबट्याच्या जबड्यातून पुतणीला सोडवलं

Trending News Today: पल्लवी आयनर यांच्यासारख्या छोट्या गावातील महिलेने आपल्या जीवाची पर्वा न करता लहान पुतणीचा जीव वाचवला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 14, 2025, 09:19 AM IST
आधुनिक हिरकणी! ९ महिन्याच्या गर्भवतीने बिबट्याच्या जबड्यातून पुतणीला सोडवलं title=
Heroic Woman Fights Off Leopard to Save niece in maharashtra

Trending News Today: बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. अनेकदा मानवी वस्तीत येऊन बिबट्या हल्ले करत असल्याच्या घटना तुम्ही ऐकल्याच असतील. या हल्ल्यात अनेकांना जीव गमावल्याचे समोरदेखील आले आहे. मात्र महाराष्ट्रातील एका महिलेने जीवावर उदार होत चिमुकलीचा जीव वाचवला आहे. ९ महिन्याच्या गर्भवतीने ४ वर्षाच्या पुतणीची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली आहे. पल्लवी आयनर असं या महिलेचे नाव आहे. डॉ. अमोल अन्नदाते यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हा प्रसंग पोस्ट केला आहे. नाशिकच्या वैजापूर तालुक्यातील ही घटना आहे. 

पल्लवी आयनर या नेहमीप्रमाणे अंगणात काम करत होत्या. त्यांची चार वर्षांची पुतणी ही त्यांच्यासोबत खेळत होती. अधूनमधून पल्लवीदेखील श्रुतीसोबत खेळत, बोलत होत्या. मात्र अचानक श्रुतीच्या ओरडण्याचा आवाज आला. एक क्षण पल्लवी यांना काय झाले हे कळलंच नाही. त्यांनी मागे वळून पाहिलं तर त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. एक क्षण त्यांना कळलंच नाही की समोर काय घडतंय. 

दबक्या पावलांनी आलेल्या बिबट्याने श्रुतीला मानेत पकडले आणि अनपेक्षितपणे झालेल्या हल्ल्याने आणि वेदनेने श्रुती कळवळली. तिने मोठ्याने रडायला सुरूवात केली. पल्लवी यांना एक क्षण कळलंच नाही काय झाले बिबट्या कुठून आला, त्याने चिमुकलीला कसे पकडले.. त्या भांबावून गेल्या पण क्षणार्धात सावरल्या. खरंतर तो प्रसंग पाहून कुणीही आपला आणि गर्भातील बाळाचा जीव वाचवण्यासाठी घराच्या आत धूम ठोकली असती. परंतु पल्लवीताईंनी नेमके त्याच्या उलट केले. श्रुतीला बिबट्याच्या जबड्यात पाहून त्यांच्यातील आई जागी झाली. स्वत:ला सुरक्षित करण्यापेक्षा पुतणीचा जीव वाचवणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटले. 

मोठ्याने ओरडत बिबट्याच्या अंगावर पल्लवीताई धावून गेल्या. त्या गर्भवती मातेचा आवेश आणि डरकाळी ऐकून बिबट्याचाही थरकाप उडाला असावा. बेसावध बिबट्याने चिमुकलीला तिथेच टाकले. कल्पनेपलिकडील प्रतिकार पाहून भेदरलेल्या बिबट्याने तिथून धूम ठोकली. पल्लवीताईंच्या प्रसंगावधानामुळे बिबट्याच्या तावडीतून श्रुती सुखरूप बाहेर पडली, असं डॉ. अमोल अन्नदाते यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

पुढे ते म्हणतात की, 'हा कुठल्याही दाक्षिणात्य किंवा बॉलीवूड चित्रपटातील प्रसंग नाही. वैजापूर तालुक्यातील तलवडे गावात घडलेली ही सत्यघटना आहे. मागच्या आठवड्यात ‘आरोग्य वारी’च्या निमित्ताने त्या गावात गेलो असता, मला या घटनेची माहिती मिळाली.' 

गर्भवती महिलेने बिबट्याला पळवून लावणे ही माझ्यासाठी खरी साहसकथा आहे. म्हणूनच मी या हिरकणीची प्रत्यक्ष भेट घेण्याचे ठरविले. बिबट्याला पाहून पल्लवीताईंच्या मनात पहिल्यांदा काय विचार आला असेल? एका गर्भवती महिलेमध्ये इतकी ऊर्जा आणि साहस कुठून आले असेल? बिबट्याच्या अंगावर जाताना त्यांना पोटातील बाळापेक्षा पुतणीला वाचवणं का महत्त्वाचं वाटलं? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनाच तेव्हाही रूंजी घालत होते आणि आत्ताही घालतायत. हे माझ्यासाठी न सुटणारे कोडे आहे. पण प्रश्नांपलिकडे एका गोष्टीचा अभिमान नक्की आहे, तो म्हणजे ही हिरकणी आपल्या वैजापूर तालुक्यातील आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.