दोन मंत्री आणि एक बेवडा खासदार, एक दमडी सुद्धा आणू शकले नाहीत - प्रणिती शिंदे

आमदार प्रणिती शिंदे यांची जीभ एका सार्वजनिक कार्यक्रमात घसरली.

Updated: Oct 26, 2018, 09:08 PM IST
दोन मंत्री आणि एक बेवडा खासदार, एक दमडी सुद्धा आणू शकले नाहीत - प्रणिती शिंदे  title=

सोलापूर : काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची जीभ एका सार्वजनिक कार्यक्रमात घसरलीय. भाजपचे खासदार शरद बनसोडे यांना बेवडा म्हणून उल्लेख करत निशाणा साधला. त्या सोलापुरात बोलत होत्या. तर निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन बालिशपणाचं वक्तव्य प्रणिती यांनी करू नये, अन्यथा मुंबईत काय काय घडते ते सोलापुरात उघड करायला वेळ लागणार नाही, असा इशारा बनसोडे यांनी दिलाय. 

सोलापूरमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सोलापूरसाठी एक दमडी सुद्धा आणू शकले नाही. दोन मंत्री आणि एक बेवडा खासदार. माफ करा, मला अशा शब्दात त्यांना बोलावे लागते आहे. येथे महिला आहे, दुसरं काय बोलणार? वा रे मोदी खेल, सस्ती दारू मेहंगा तेल, अशा शब्दात त्यांनी जोरदार फटकारे लगावलेत. तसेच आपल्या देशात सर्वात मोठा डेंग्यूचा डास आला आहे. त्यांचं नाव आहे मोदीबाबा. देशात मोदीबाबा नावाचा डेंग्यूचा मोठा डास त्रासदायक आहे, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीका केली. फवारणी करुन या डासाला पुढच्या वर्षी हाकलून लावायचे आहे. आज सगळ्यांना आजार होतोय, असं प्रणिती शिंदेंनी म्हटलं आहे.

मोदींना खोटं बोलण्याची सवय लागली आहे. 15 लाख जमा करुन देतो असे म्हणाले होते. कुठे गेले ते पैसे? नोटाबंदीमुळे सर्वसामन्यांना फटका बसला. मोदींना ना बहीण आहे, बायको आहे ना मुलगी, त्यामुळे त्यांना महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दल कळणार नाही. आई आहे पण नोटाबंदीवेळी तिला रांगेत उभं केलं ते पण फोटोसाठी. जग फिरतात पण कधी शेतकऱ्यांमध्ये येऊन त्यांची परिस्थिती पाहत नाही, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.