नागपूर: राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी CAA, NRC आणि NPR च्या मुद्द्यावरून केलेल्या एका आक्षेपार्ह टिप्पणीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. परदेशातून भारतात आलेले ब्राह्मण आम्हाला प्रमाणपत्र आणा म्हणून अक्कल शिकवत आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले. ते महिला दिनी नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी नितीन राऊत यांनी CAA, NRC आणि NPR विरोधात काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. हा व्हीडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर नितीन राऊत यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
मराठी मालिकांमध्ये जातीयवाद; दिग्दर्शक सुजय डहाकेची टीका
CAA, NRC आणि NPR ला काँग्रेसचा विरोध आहे. काँग्रेसने २०१० साली जो NPR आणला होता, त्याच अटी आणि शर्ती कायम असतील तर NPR लागू करण्यास आमची हरकत नाही. अन्यथा आम्ही NPR लागू होऊ देणार नाही. माझ्या आजोबांचे ५० वर्षांपूर्वीचे प्रमाणपत्र मागवले तर मी देऊ शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मी दलित असताना सुद्धा शिक्षणाची संधी मिळाली. त्यामुळे मी आजोबांचे प्रमाणपत्र आणू शकेन. पण, भटके-विमुक्त लोक प्रमाणपत्र कुठून आणतील? जे स्वत: परदेशातून येथे आले. ते ब्राम्हण आम्हाला अक्कल शिकवतील काय? हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही, अशी टीका नितीन राऊत यांनी केली होती.
औषधं नीट घेत चला; शरद पोंक्षेंना 'या' व्यक्तीचा बोचरा सल्ला
तसेच देशातील मुस्लिमांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे स्वत:ला भारतीय म्हणायला सुरुवात करावी, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मुस्लिमांनी नेता मानले असते तर बाबासाहेबांच्या विचाराने पुढे जाऊन मुस्लिमांनी हिंदुस्थान म्हणणे सोडले असते. यानंतर मुस्लिमांना हात लावायची कोणाचीही ताकद नसती. आज ती संधी पुन्हा आली आहे. ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी स्वत:ला भारतीय म्हटले, त्याच पद्धतीने यापुढे प्रत्येक मुस्लीम बांधवांनी स्वत:ला भारतीय आणि हिंदुस्थान ऐवजी भारत म्हणावे, असे राऊत यांनी सांगितले.