अहमदनगर : महाराष्ट्रात कोरोनाचा आणखी एक रुग्ण सापडला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १८ वर पोहोचली होती. कोरना झालेली ही व्यक्ती अहमदनगरची आहे. दुबईला गेलेल्या ४० जणांच्या गटातील ही व्यक्ती आहे. या व्यक्तीला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या व्यक्तीला रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.
या व्यक्तीची प्रकृती स्थिर आणि चांगली आहे. रुग्णाला अद्याप सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणं आढळून आलेली नाहीत. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येणार असल्याचं अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
नागरिकांनी काळजी करण्याचं किंवा घाबरण्याचं कारण नाही. तसंच नागरिकांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं पालन करावं आणि सहाकार्य करावं. गावोगावी भरणाऱ्या यात्रा आणि उरुसाच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणं टाळावी, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे पुण्यातून १०, नागपूरमधून ३, मुंबईतून ३, ठाण्यातून १ आणि नगरमधून १ रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची पावलं उचलली आहेत. विधानसभेमध्ये उद्धव ठाकरेंनी याबाबतची घोषणा केली आहे. चीन, दक्षिण कोरिया, इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि इराण या ७ देशांना भेट दिली असेल त्यांना स्थानबद्ध करण्यात येणार आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमधल्या जीम, स्विमिंग पूल, थिएटर आज रात्री १२ वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या शाळा बंद राहणार आहेत, पण इतर शहरांमधल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधल्या शाळा पुढील सूचना येईपर्यंत बंद राहतील. शहरांमधले मॉल सुरु राहणार, पण तिकडे गर्दी करु नये, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.
नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तसंच हॉटेलमध्ये जाणंही टाळावं. शक्य असेल तिकडे खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमला परवानगी द्यावी, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला आहे. धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि राजकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमांना परवानगी दिली असेल, तर ती रद्द करावी, असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.