'पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ देऊ नका'

मुख्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन   

Updated: Oct 11, 2020, 04:49 PM IST
'पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ देऊ नका' title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधत काही महत्त्वाच्या मुद्दयांना अनुसरुन जनतेला संबोधित केलं. मेट्रो कारशेड, सामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा इथपासून ते राज्यातील शेतकरी आणि कोरोना परिस्थितीबाबतही त्यांनी वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. 

कोरोनाशी दोन हात करत असताना सर्वांनी काळजी घ्यायचीच आहे, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. 'कोरोना अजून आपल्यातून गेलेला नाही. जगात काही देशांत, तर याची दुसरी लाट आली आहे त्यामुळं आपल्याला सावधपणे पुढं जावं लागत आहे', असं म्हणत काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

शासनाची जनतेप्रती असणारी जबाबदारी अधोरेखित करत जनतेच्या प्रेमापोटीच मंदिरे, लोकल आणि जीमसंदर्भातील निर्णय आपण अजून घेतलेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात कोरोनाचा संसर्ग असतानाही टप्प्याटप्प्यानं अनलॉक करत अनेक सुविधा आणि सेवा पूर्ववत करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली गेली. पण, अनेक ठिकाणी असं होत असतानाच कोरोनाचा मात्र विसर पडल्याचं भीषण चित्र पाहायला मिळालं. परिणामी काही अंशी नियंत्रणात असणारी परिस्थिती पुन्हा चिंतेत टाकणाऱ्या वळणावर आली. 

 

राज्यातील अशाच परिस्थितीवर भर देत आणि संकट टळलेलं नाही, हेच पुन्हा सांगत सुरु केलेली कोणतीही गोष्ट आपल्याला पुन्हा बंद होऊ द्यायची नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. शिवाय मुख्यमंत्र्यांनी जनतेला लॉकडाऊन लावण्याची वेळ पुन्हा येऊ देऊ नका, शिस्त पाळा, आरोग्य सांभाळा असं आवाहनही केलं.