दीड वर्षात मी एकही सुट्टी घेतली नाही, आता मोदींचे हात बळकट करायचेत- मुख्यमंत्री

CM Eknath Shinde:  मावळ लोकसभेसाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी मावळ मधील किवळे येथे मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेतली.  

Updated: Jan 6, 2024, 09:16 PM IST
दीड वर्षात मी एकही सुट्टी घेतली नाही, आता मोदींचे हात बळकट करायचेत- मुख्यमंत्री title=

CM Eknath Shinde: गेल्या दीड वर्षात मी एकही दिवस सुट्टी घेतली नाही, आता मोदींचे हात आपल्याला बळकट करायचेयत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किवळे येथील  शिवसेनेच्या शिवसंकल्प यात्रेदरम्यान बोलत होते. मावळ लोकसभेसाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी मावळ मधील किवळे येथे मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेतली.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वर्गीय बाळासाहेब यांच्यावर आम्ही मते मागितली, आम्ही भाजप सोबत युती होती. युती म्हणून नागरिकांनी आम्हाला मते दिली. निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भूमिका वेगळी घेतली. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस पक्षाच्या गाडण्याची भाषा केली त्या काँग्रेसला ह्यांनी डोक्यावर घेतले. बाळासाहेबांनी सांगितलं होतं शिवसेना ही काँग्रेस होईल तेव्हा माझं हे दुकान बंद करेल. असे शब्द बाळासाहेबांचे होते, हे आम्ही उघड्या डोळ्यांनी कस पाहू शकत होतो.  2019 मध्ये सत्ते साठी तुम्ही तिलांजली दिली तेव्हाच आम्ही बंड केला असता. गहाण ठेवलेला धनुष्यबाण कसा सुटेल हा विचार करून हा निर्णय घेतलाय, मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय देणार या विचाराने निर्णय घेतल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

शेवटी मुख्यमंत्री म्हणून घेतली जबाबदारी त्याच सोनं करणे हे माझं काम आहे म्हणून शिव संकल्प अभियान आपल्याला काय मिळेल नाही जनतेला काय मिळेल त्यासाठी आहे. महायुतीचा माध्यमातून आपण लढणार आहोत, आपण मजबूत आहोत. इंडिया का इंडी आघाडी मध्ये एक नेता निवडता येत नाहीये, आपल्याकडे नरेंद्र मोदीजी आहेत. हे डबल इंजनचे सरकार आहे, सगळ्यांना न्याय द्यायचं काम सुरू असल्याचे ते म्हणाले. 

अहंकारामुळे सगळी कामे बंद होती, मेट्रो प्रकल्प बंद केले, केंद्राकडून मदत मागितली नाही, राज्याला अहंकारामुळे मागे नेलं. 2019 मध्ये सत्ते साठी तुम्ही तिलांजली दिली तेव्हाच आम्ही बंड केला असतं. शिवसेना वाढायची सोडून तिला आणि बाळासाहेबांच्या विचारांना मूठ माती देण्याचं काम सुरू होत, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली. आमदार, खासदार, नगरसेवक एवढी लोक माझ्यासोबत का आले? आमच्याकडे बाळासाहेबाचे विचार आहेत. ते रोज आरोप करतात पण मी कामाने उत्तर देतो, असे त्यांनी सांगितले.

आज रस्ते साफ केले. आता बऱ्याच लोकांची साफसफाई करायची आहे. बघतो करतो हे काम माझं नाही. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम माझं आहे.
पिंपरी चिंचवड शहरात नाट्यगृहाच भाडे जास्त होते मी तात्काळ महापालिका आयुक्त यांना सांगून ते कमी केलं आणि GR देखील काढला.खुर्चीच्या मोहापायी बाळासाहेबांच्या विचारणा तिलांजली दिली गेली. बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवण्यासाठी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला. कुठल्या मोहापायी हा निर्णय घेतला नाही तर गहन ठेवलेला धनुष्यबाण कसा सुटेल यासाठी निर्णय घ्यावा लागल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 
 
सरकारी काम सहा महिने थांब ही संकल्पना मोडीत काढली आहे. त्यामुळे शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवत आहे. मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. कालही आणि आजही कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. 
 
 खुर्चीच्या मोहापायी काय कमावलं आणि काय गमावलं हे बघितलं पाहिजे. आरोप प्रत्यारोप करून काही होणार नाही. आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आरोप करून भागणार नाही. आमचा हेतू स्वच्छ आणि स्पष्ट आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणार नाही. लढत राहील पाहीजे.. दीड वर्षांपूर्वीची लढाई पेक्षा ही लढाई मोठी नाही. प्रयत्न करत रहा यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. या निवडणुकीत मोदींचे हात आपल्याला बळकट करायचे आहेत. एकही सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री आपण पाहिला नव्हता.