मुंबई : आपल्या भावाला कोणती राखी आवडेल ? हा बहिणींना दरवर्षी पडलेला प्रश्न. पण यावर्षी 'चायना राखी' न घेण्याचा निर्धार बहिणींनी केल्याचे पाहायला मिळत आहे. भाऊ मंडळींनीही आम्हाला ‘चिनी राखी नकोच’ असे सांगितले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या डिझायन्सच्या आकर्षक राख्यांनी फुललेल्या बाजारात चिनी राख्या पडूनच असल्याचे दुकानदार सांगत आहेत.
बहिण-भावांच्या पवित्र नात्याला अधिक समृद्ध करणारा रक्षाबंधनचा सण एका दिवसावर येऊन ठेपला आहे. बहिण-भावांची रक्षाबंधनाची लगबग सुरु झालेली पाहायला मिळते. डोक्लाम सीमारेषेवरुन भारत आणि चीनमध्ये सध्या वाद सुरु आहेत. सध्या जरी शाब्दीक चकमकी होत असल्या तरी चीन वेळोवेळी युद्धाचे आमंत्रण देताना दिसत आहे. याच पार्श्वभुमीवर भारतात रक्षाबंधनाचा सण आला आहे. दरवर्षी रक्षाबंधनाला भारतीय बाजारपेठ चीनी बनावटीच्या राख्यांनी सजलेली दिसते. पण यावर्षी चीनी बनावटीच्या राख्यांना बाजारातून उठाव नसल्याचे निदर्शनास आले आहे. भारतीय सणांची नस ओळखुन चीन प्रत्येक प्रकारच्या स्वस्त वस्तू बाजारात आणत असतो. याला भारतीय बाजारपेठेत खुप पसंतीही असते. पण यावेळेस मात्र चायनीज राख्यांना बॉयकॉट करण्याचा निर्धार बहिण-भावांनी मिळून केला आहे. मी पारंपारीक, भारतीय बनावटीचीच राखी भावाला बांधणार असल्याचे भायखळा येथे राहणारी ज्योती शिरधनकर हिने सांगितले.
'आमच्या दुकानात वेगवेगळ्या डिझाइन्स, प्रकारच्या राख्या दरवर्षी उपलब्ध असतात. रक्षा बंधनच्या काही दिवस अधीपासूनच राख्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. यावेळेस चीनी राख्यांना घेण्याचे युवती जाणिवपूर्वक टाळतायत' असे निदर्शनास येत असल्याचे परळचे दुकानदार विजय मयेकर यांनी सांगितले.