राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची थट्टा; 2019 चाच पेपर जशाच्या तसा 2023 च्या परीक्षेला

Fellowship Exam : फेलोशिपसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या बाबतीत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पूर्वीचीच प्रश्नपत्रिकाच दिली आहे.

विशाल करोळे | Updated: Dec 24, 2023, 02:58 PM IST
राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची थट्टा; 2019 चाच पेपर जशाच्या तसा 2023 च्या परीक्षेला title=

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरहून एक धक्कादायक बातमी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी बारटी, सारथी आणि महाज्योती या फेलोशिपसाठी राज्य सरकारने परीक्षा घेण्यात आल्या आहेत. राज्यभरात ही परीक्षा झाली आहे. मात्र या परीक्षेत एक वेगळाच गोंधळ पुढे आलाय. 2023 चा हा पेपर 2019 च्या सेट पेपरप्रमाणे असल्याचा धक्कादायक दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. म्हणजे 2019 साली जी प्रश्नपत्रिका देण्यात आली तीच पुन्हा विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी देण्यात आली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे या प्रश्नपत्रिकेत अगदी प्रश्नांचा क्रम सुद्धा तोच होता. 2019 मध्ये सेटसाठी जी परीक्षा घेण्यात आली होती तोच पेपर 2023 च्या या फेलोशिपच्या परीक्षेसाठी वापरण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सगळ्या प्रकारावर आता विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. अशातच ज्या विद्यार्थ्यांनी जुन्या पेपरच्या माध्यमातून अभ्यास केला आहे त्यांना या परीक्षेत पूर्णपैकी पूर्ण गुण मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. यातून राज्य सरकारने नवा पेपर काढण्याचीही तसदी घेतली नसल्याचे पुढे आलं आहे. फक्त जुना पेपर कॉपी करून 2023 साठी पेस्ट करण्यात आल्याचे समोर आले आहे. आता खरंच या परीक्षेचा जो निकाल लागेल त्यातून गुणवत्ता पुढे येणार का असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जातोय..

दुसरीकडे, आजचा सारथी महाज्योती आणि बार्टीच्या फेलोशिपसाठी जो पेपर घेण्यात आला तो पेपर फुटल्याचा आरोपही काही विद्यार्थ्यांनी केलाय  पेपर हा फुटलेल्या इन्व्हलपमध्ये आला होता. तसेच त्याच्यावर विद्यार्थ्यांच्या सह्या सुद्धा  घेतल्या नाही. त्यामुळे हा पेपर आधीच फोडला होता असाही आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांनी आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांनी काय म्हटलं?

"पेपर द्यायला आल्यानंतर ते सीलबंद नव्हते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2019 सालचा पेपर आणि आजचा पेपर सारखाच होता. दोन्ही पेपर सारखेच आहेत. त्यांनी प्रश्न क्रमांक सुद्धा बदललेले नाहीत. आम्हाला हे कळलं असतं तर आम्ही पैकीच्या पैकी गुण घेऊन पास झालो असतो," असे एका विद्यार्थ्याने म्हटलं आहे. 'विद्यापीठ आयोगाच्या अनुषंगाने प्रश्नपत्रिका या एका बॉक्समध्ये येतात. पण असाच कोणताच प्रकार आम्हाला पाहायला मिळाला नाही. त्याच्यावर कुठल्याही विद्यार्थ्याची सही नव्हती. एखाद्या गलालाने ही प्रश्नपत्रिका फोडली आणि नंतर ती आतमध्ये आणली,' असा आरोप विद्यार्थ्याने केला आहे.