कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमधल्या पिंपळे सौदागर भागातली रॉसलँड सोसायटी सध्या चर्चेत आहे. सोसायटीला केंद्र सरकारचा स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला आहे. नेमकं काय केलं रोसलँडवासियांनी जर जाणून घ्याल तर, तुम्हालाही स्वच्छतेबाबत अधिक हुरूप येईल हे नक्की.
केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पिंपरी चिंचवडच्या रोसलँड सोसायटीला पुरस्कार दिला आहे. तब्बल ९८२ फ्लॅट्स आणि साडेचार हजारांहून अधिक लोक या वसाहतीत राहतात. २०१० पासून वासहतीतले रहिवाशी ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवतात. त्यातील ओल्या कचऱ्यावर वसाहतीतच सेंद्रीय खत बनवलं जातं. त्यासाठी विशेष यंत्रणा वसाहतीत लावण्यात आली आहे. असंख्य झाडांनी वेढलेल्या या वसाहतीतील झाडांनाच ते खत टाकले जातं. ओला कचराच नाही तर 'ई' कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ही वसाहतीत विशेष सोय करण्यात आली. ई कचरा प्रक्रिया करणाऱ्या एजन्सीला दिला जातो.
पिंपळे सौदागर हा तसा उच्चभ्रू भाग.. जवळपास ८० टक्के नागरिक आयटी इंडस्ट्रीत काम करणारे. त्यामुळे साहजिकच प्रकल्प राबवण्यासाठी आर्थिक सुबत्ताही आहे. मात्र केवळ आर्थिक सुबत्ता आहे म्हणून नाही, तर स्वच्छतेसाठी धोरण राबवण्याची दृष्टी इथे शिकल्या सवरल्या नागरिकांमध्ये आहे. त्यातूनच हे उत्तम पाऊल त्यांनी उचललं.
रोसलँडचा उपक्रम विचारात घेऊन तुम्हीही स्वत:ला काही प्रश्न नक्कीच विचारू शकता. ज्यातून तुम्हाला स्वच्छतेचा उपक्रम कसा सुरू करावा याची एक दिशा मिळू शकते.