अमरावतीमध्ये 13 वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळणं; शवविच्छेदनातून मोठा खुलासा

अमरावतीमध्ये रामपुरी कॅम्प परिसरातील विद्याभारती माध्यमिक विद्यालयाच्या १३ वर्षीय विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला होता

Updated: Jul 23, 2022, 05:53 PM IST
अमरावतीमध्ये 13 वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळणं; शवविच्छेदनातून मोठा खुलासा title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावतीमध्ये (Amravati) रामपुरी कॅम्प परिसरातील विद्याभारती माध्यमिक विद्यालयाच्या १३ वर्षीय विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला होता. यानंतर आता याप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे.
आदर्श कोगे (Adarsh Koge) या विद्यार्थ्याचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून (Autopsy Report) स्पष्ट झाले होते. त्यानंतर ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 रामपुरी कॅम्पच्या भागात असलेल्या विद्याभारती मागासवर्गीय वस्तीगृहात आदर्श कोगे या विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी वसतिगृहाचे अधीक्षक विरुद्ध शुक्रवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र पांडुरंग तिघाडे असे अधिक्षकांचे नाव असून त्याला गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

आदर्श नितेश कोगे या आदिवासी विद्यार्थ्याचा मृतदेह गुरुवारी सकाळी संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. मुलाचा मृत्यू नैसर्गिक नसून, तो घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप आदर्शच्या वडीलांनी केला होता.

मृतदेहाच्या शवविच्छेदचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी रविंद्र तिघाडेला अटक केली आहे. त्यामुळे आदर्श कोगे मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. याप्रकरणी विद्याभरती येथील वसतिगृह अधीक्षक रवींद्र तिघाडे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नाक, तोंड दाबल्याने श्वास गुदमरल्याने आदर्शचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. आदर्शच्या वडिलांच्या तक्रारी वरून अधीक्षकाविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.