प्रताप नाईक, झी मीडिया, बेळगाव: (Maharashtra Karnatak Belgaum) महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये असणारा सीमावाद पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत असून, ही ठिणगी आता नव्यानं धुमसताना दिसत आहे. कर्नाटक सरकारचे बेळगाव मध्ये हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतोय या पार्श्वभूमीवर विरोध करण्यासाठी याच धर्तीवर बेळगावात मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचं आयोजन केलेलं असताना कर्नाटक सरकारनं या मेळाव्याला परवानगी नाकारत महाराष्ट्रातील नेत्यांनाही राज्यात प्रवेशबंदी लागू केली आहे.
सोमवारी सकाळपासून या परिस्थितीला गंभीर वळण मिळत असल्याचं पाहायला मिळालं जिथं बेळगावमध्ये कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरुच असल्याचं दिसून आलं. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते पोलिसांच्या नजरकैदेत असल्याची वस्तूस्थिती बेळगावमधून समोर आली. एकिकडे झी 24तासचे प्रतिनिधी वार्तांकन करत असतानाच दुसरीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते मालोजी अष्टेकर यांचा पोलिसांकडून पाठलाग केला जात असल्याचं दृश्य पाहायला मिळालं. व्यायामासाठी बाहेर पडले असतानादेखील त्यांच्यामागे पोलिसांचा पाठलाग सुरूच असल्यामुळं मराठी भाषिकांपुढं असणारी आव्हानं पुन्हा एकदा समोर आली.
बेळगावमधील या महामेळाव्यासाठी कोल्हापूर मधून ठाकरे शिवसेनेत मोठ्या संख्येने बेळगावकडे जाणार आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांकडून कोल्हापूरच्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय दवणे यांच्यासह प्रमुख नेत्यांना कर्नाटक मध्ये प्रवेश बंदी करण्यात आली असून, तशा नोटीस देखील बजावण्यात आल्या. सोमवारी म. एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि नेते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी जात असतानाच तिथं कर्नाटक पोलिसांच्या तुकडीनं या नेत्यांना रोखलं. यावेळी 'आम्हाला अभिवादन करत हार अर्पण करण्यासाठी जाऊद्या', अशी विनंती करूनही पोलिसांनी या विनवणीला न जुमानताच त्यांना ताब्यात घेतलं आणि इथं एकच गोंधळ माजला.
नेत्यांना धक्काबुक्की करत मराठी भाषिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि लोकशाही पद्धतीनं आंदोलन करत असतानाही ते दडपण्यासाठी केला जाणारा बळाचा वापर गैर असल्याच्या घोषणा आणि ठाम भूमिका मांडत नेत्यांनी आक्रोश केला. 'महाराजांच्या मूर्तीला हार घालण्यात चुकीचं काय?' असा थेट सवाल यावेळी या नेत्यांनी संतप्त स्वरात विचारला. सकाळपासूनच नेत्यांसोबत पोलिसांची धरपकड सुरू असून, बेळगावमधील वातावरणाला तणावग्रस्त वळण मिळताना दिसत आहे.