रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे. मात्र, ती बंदी झुगारून बैलगाडा शर्यत घेण्याचा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडाळकर यांनी दिला आहे. त्यामुळं सांगली जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीतून राडा सुरू झालाय.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे. मात्र, ही बंदी झुगारून गनिमी काव्यानं बैलगाडा शर्यत घेण्याचा इशारा पडळकर यांनी दिला आहे. पडळकरांच्या हट्टामुळं जिल्हा प्रशासन कामाला लागलं आहे. आटपाडी तालुक्यातील झरे गावाला छावणीचं स्वरूप आलं आहे. तर आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. प्रत्येक रस्त्यावर नाकाबंदी सुरू आहे. बैलगाडा शर्यतीच्या मैदानात पोलिसांनी चरी पाडल्यात.
मात्र या साऱ्या बंदोबस्ताला झुगारून बैलगाडा शर्यत होणारच, असा निर्धार पडळकरांनी केला आहे. तालिबानने बंदुका घेऊन सर्व हातात घेतलं आहे, तसं इथे सुरु आहे, झरे गाव परिसरात संचारबंदी लागू केली आहे अशी टीका पडळकर यांनी केली आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत, आम्ही आमचं काम करु, राज्य सरकार ही विषय गंभीरतेनं घेईल, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
बैलगाडा शर्यतीवरून पडळकर विरुद्ध पोलीस असा संघर्ष सांगलीत गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळतोय. मात्र, आता हा संघर्ष टोकाला पोहचला असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. आता अशा परिस्थितीत खरंच पुन्हा बैलगाडा शर्यत होणार का, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.