नागपूर : भाजप नगरसेवकांच्या गुंडगिरीचं नवं उदाहरण समोर आलंय. नागपुरातील एसएनडीएल या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर भाजपच्या 5 ते 6 नगरसेवकांनी बुधवारी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नागपुरात एसएनडीएल कंपनीमार्फत वीज पुरवठा केला जातो. शहरातील २६ नगरसेवकांचं गेल्या काही महिन्यापासून वीज बिल थकलंय. थकबाकीदार नगरसेवकांमध्ये सर्वात जास्त संख्या भाजप नगरसेवकांची आहे. थकबाकीदारांच्या यादीत नाव घातल्यानं चिडलेल्या भाजप नगरसेवकांनी छापरु नगर येथील एसएनडीएल कंपनीच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली.
भाजपचे माजी महापौर प्रवीण दटके, नगरसेवक नरेंद्र बोरकर, बंटी कुकडे व काही महिला नगरसेवकांचा देखील या हल्ल्यात समावेश असल्याचे समजते. यावेळी कार्यालयातील साहित्य आणि कर्मचाऱ्यांच्या वाहनांचं नुकसान झालं.
या प्रकाराविरुद्ध पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं एसएनडीएल अधिकाऱ्यांनी सांगितलं.