MNS BJP Aalince, Amit Thackeray : राज ठाकरे यांची मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. तशा प्रकारच्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मनसे भाजप युतीबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज दिल्लीत अमित शाहांशी भेट घेतली. महायुतीमध्ये मनसेला दोन लोकसभेच्या जागा मिळण्याची शक्यता आहे. या दोन जागांपैकी एका जागेवर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) निवडणुक लढवणार आहे. ठाकरे घराण्यातील दुसरा व्यक्ती आहे जो प्रत्यक्षात निवडणूक लढवणार आहे.
तब्बल 30 मिनिटं अमित शाहांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरे दिल्लीतून मुंबईसाठी रवाना झाले आहेत. राज ठाकरे हे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. अमित शाहांसोबतच्या बैठकीला विनोद तावडेंसह अमित ठाकरेही उपस्थित होते. राज ठाकरे महायुतीत आल्यास महाराष्ट्रात भाजपला फायदा होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत गणितं बदलू शकतात. त्यामुळे राज ठाकरेंना महायुतीत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.
महायुतीमध्ये मनसेला लोकसभेच्या दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबई आणि शिर्डी या दोन लोकसभेच्या जागा मनसेला मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईतून तरुण आणि सुशिक्षित चेहरा असावा यासाठी अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी असा भाजपचा आग्रह असल्याची माहिती सुत्रांकडून मिळली आहे. तर, शिर्डी मधून मनसेचे नेते बाळा नांदगावकर उमेदवार असू शकतील अशी देखील चर्चा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर मनसे महायुतीमध्ये लवकरच सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.
ठाकरे घराणं राजकारणात सक्रिय असलं तरी ठाकरे घराण्यातील कुणीही प्रत्यक्षात निवडणुक लढवली नव्हती. आदित्य ठाकरे ठाकरे हे ठाकरे घराण्यातील पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी प्रत्यक्षात निवडणुक लढवली होती. यानंतर आता अमित ठाकरे हे ठाकरे घराणातून निवडणूक लढवणारे दुसरे व्यक्ती आहेत. अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवल्यास मतदार त्यांना कौल देतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.