Maharashtra Weather News : मागील 48 तासांपासून देशभरात हवामानाचे तालरंग बदलले असून, बहुतांश भागांमधून थंडीनं काढता पाय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील बहुतांश भागांमध्ये पहाटेच्या वेळी आणि सायंकाळी थंडीची चाहूल लागत असली तरीही दुपारच्या वेळामध्ये मात्र उष्मा जाणवत असल्यामुळे थंडीती तीव्रता कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या वृत्तानुसार पुढील 24 तासांमध्ये राज्यातील सरासरी कमाल तापमान 26 अंश असू शकतं, तर देशाच्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये जोरदार बर्फवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्रात पुढील 24 तासांमध्ये ढगाळ वातावरणाचा प्रभाव पाहायला मिळणार असून, तापमानात चढ- उतार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरणामुळं पावसाचं सावट असून, काही भागांमध्ये तापमानावाढ नोंदवली जाईल.
पश्चिम महाराष्ट्रापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सकाळच्या वेळी धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. ज्यामुळं उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा आकडा 10 अंशांपर्यंत घसरला असला तरीही दिवसभर मात्र उन्हाचा चटका अनुभवायला मिळत आहे. राज्यात सध्या धुळ्यात 8 अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली असून, सर्वाधिक तापमानाची नोंद रत्नागिरी इथं करण्यात आली आहे. जिथं तापमानाची नोंद 35 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली आहे.
सध्या देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून, हे वातावरण काही दिवसांसाठी स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. गुलमर्ग इथं तापमानाचा आकजा 1.6 अंशांवर पोहोचला असून, श्रीनगरमध्येही थंडीचा कडाका कायम असून, इथं तापमान उणे 2 डिग्रीवर पोहोचला आहे. काश्मीरच्या खोऱ्यातही प्रचंड हिमवृष्टी होत असल्यामुळं इथं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सध्या श्रीनगरच्या दिशेनं येणाऱ्या विमान वाहतुकीरही या वातावरणाचा परिणाम झाल्याची माहिती समोर येत आहे.