Madhukar Pichad Passed Away : ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड (Madhukar Pichad ) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचड यांना नाशिक येथील नाईन पल्स रूग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मागील दीड महिन्यांपासून पिचड यांच्यावर उपचार सुरू होते. आज पिचड यांची प्रकृती आणखी खालावली आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मधुकरराव पिचड हे 1980 ते 2004 या काळात नगरमधील अकोले विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे आमदार म्हणून सलग सात वेळा निवडून आले आहेत. मार्च 1995 ते जुलै 1999 या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेतेही होते. मधुकर पिचड राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते, परंतु 2019 मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते.
मधूकर पिचड यांची शरद पवारांचे खंदे समर्थक म्हणून ओळख
पिचड हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत होते
2014 पर्यंत मधुकर पिचड हे अकोले विधानसभेचे आमदार होते
2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर वैभव पिचड विजयी
2019 मध्ये पिचड पितापुत्रांचा भाजपमध्ये प्रवेश
2019 मध्ये राष्ट्रवादीच्या किरण लमहाटे यांच्याकडून वैभव पिचड यांचा पराभव
अकोले तालुक्यातील नगरपालिका आणि अगस्ती दूध संघावर पिचड यांचं वर्चस्व