पुणे : यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmanya Tilak National Award) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना जाहीर करण्यात आला आहे. पुण्यात (Pune) होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितीत राहणार असल्याची माहिती आहे. 1 ऑगस्टला हा पुरस्कार सोहळा होणार असून या कार्यक्रमाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील आमंत्रण देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखिल या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार आहेत. दर वर्षी 1 ऑगस्टला पुण्यातील लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार पीएम मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये, असं लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचं स्वरुप आहे. 1983 पासून राष्ट्रीय पातळीवरील हा पुरस्कार देण्यात येतो. कृषी, आरोग्य, अर्थ, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मोलाच्या योगदानामुळे पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 2014 आणि 2019 अशा सलग दोन वेळा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून काम पाहातायत. सबका साथ, सबका विकास या ध्येयाने काम करणाऱ्या पीएम मोदी यांनी विकासाभिमूख आणि भ्रष्टाचारमुक्त देशाचं स्वप्न पाहिलं आहे. आयुष्मान भारत योजना, पंतप्रधान घरकुल योजना, पंतप्रधान जन-धन योजना, पंतप्रधान घरकुल योजना, पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना, अशा अनेक योजना राबवल्या आहेत. देशाला जागतिक पातळीवर मानाचं स्थान मिळवून दिलं आहे. या कार्यासाठी पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय परुस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.
कोणाला मिळालेत पुरस्कार
याआधी एस.एम. जोशी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन.आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, माँटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. कैलासावडिवू सिवन, बाबा कल्याणी, सोनम वांगचुक, डॉ. सायरस पूनावाला यांच्यासह अन्य दिग्गजांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं आहे.
काँग्रेसचा विरोध
दरम्यान, काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाला विरोध केला आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार लोकमान्य टिळक यांच्या विचारांशी कधीपासून जुळायला लागले' असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.